निठारी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोलीचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटलं आहे की सुरेंद्र कोलीची तातडीने सुटका करण्यात यावी. २००५ ते २००७ या दोन वर्षांच्या कालावधीत नोएडा येथील निठारी भागात कोवळ्या वयातील मुलींच्या सामूहिक हत्यांची घटना घडली होती. ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता.

सुरेंद्र कोलीवर एकूण १३ प्रकरणांमध्ये गुन्ह्यांची नोंद होती. त्यापैकी १२ गुन्ह्यांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. अलहाबाद उच्च न्यायालयानेच तो निर्णय दिला होता. मात्र एक प्रकरण बाकी होती. ज्यात त्याची शिक्षा कायम होती. या प्रकरणातही त्याला जामीन मंजूर झाला आहे. १२ प्रकरणांमध्ये पुरावे आणि तथ्यांच्या आधारे जामीन मिळाला असेल तर एका प्रकरणात शिक्षा कायम ठेवणं न्यायाच्या विरोधात आहे त्यामुळे त्याची सुटका करण्यात येत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

निठारी हत्याकांड नेमकं काय आहे?

२००६ मध्ये नोएडाच्या निठारी गावातल्या कोठी क्रमांक डी ५ च्या नाल्यातून सांगाडे मिळू लागले. ही बातमी जशी देशभरात पसरली तेव्हा संपूर्ण देश हादरला. कारण सीबीआयला तपासा दरम्यान ४० अश्या गोण्या मिळाल्या होत्या ज्यामध्ये मानवी अवयवांचे तुकडे होते. या प्रकरणी पोलिसांनी कोठीचे मालक मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली या दोघांना अटक केली. ७ मे २००६ ला पायल नावाची एक मुलगी बेपत्ता झाली. ती मोनिंदर पंढेर यांच्या कोठीमध्ये रिक्षाने आली होती.

पायल नावाच्या मुलीमुळे हत्याकांडाची घटना कशी उघडकीस आली?

पायल ज्या रिक्षाने आली होती त्यातून उतरुन ती आतमध्ये गेली. मी आत जाऊन येते आणि तुला पैसे देते असं तिने सांगितलं होतं. त्यामुळे हा रिक्षावाला या कोठीबाहेरच थांबला होता. बराच वेळ झाला तरीही पायल बाहेर आली नाही. त्यामुळे रिक्षावाल्याने पैसे घेण्यासाठी आत जाऊन कोठीचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी सुरिंदर कोलीने त्याला सांगितलं की पायल इथून निघून गेली आहे. रिक्षावाल्याचं म्हणणं होतं की मी कोठीसमोरच थांबलो होतो पायलला जाताना पाहिलेलं नाही. यानंतर पायल नावाची मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलं. पायलच्या वडिलांनी या प्रकरणी FIR नोंदवली आणि पोलिसांनी तिचा शोध सुरु केला.

१२ हून अधिक मुलं झाली बेपत्ता

पोलिसांना या प्रकरणात हे लक्षात आलं की निठारीतून १२ पेक्षा जास्त मुलं बेपत्ता झाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पायलकडे एक मोबाइल होता जो स्विच ऑफ लागत होता. पोलिसांनी या नंबरचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा त्यांना मुंबईसह अनेक भागांमधले नंबर मिळाले. या फोन क्रमांकांची चौकशी झाली त्यात असं काही आढळलं की पोलिसांनी कोठीवर छापा मारला. त्यानंतर मणिंदर सिंह पंढेर आणि सुरिंदर कोली या दोघांना अटक केली. ज्यानंतर निठारीचं भयंकर हत्याकांड उघडकीस आलं.