भाजपशी काडीमोड घेतल्यानंतरही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न मिळावा या भाजपच्या सुरात सूर मिसळला आहे.वाजपेयी त्या पुरस्कारासाठी योग्य आहेत, त्यांना तो का मिळायला नको? असा प्रतिप्रश्न त्यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारली असता विचारला. याखेरीज राममनोहर लोहिया आणि कर्पुरी ठाकूर यांनाही भारतरत्न मिळायला हवे, अशी मागणी नितीशकुमारांनी केली आहे. सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिल्याबद्दल नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिवारी यांच्या मताशी नितीशकुमार यांनी अहसमती दर्शवली. सचिनचे योगादान मोलाचे आहे, असे नितीशकुमार यांनी सांगितले. राजकीय नेतृत्व अक्कलशून्य आहे, अशी टीका भारतरत्न सीएनआर राव यांनी केली होती. त्याबाबत विचारले असता, राव हे महान शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या उत्तम कामाबद्दल आपण चर्चा करू, अशी  प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली.