नितीश कटारा हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपी विकास यादव व त्याचा चुलतभाऊ विशाल यांना फाशीची शिक्षा देण्याची विनंती फेटाळली असून जन्मठेपेऐवजी २५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांनाही हत्येबाबत पश्चात्ताप नाही व त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांचा  तुरूंगवास पाच वर्षांनी वाढवण्यात आला आहे.
विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश गीता मित्तल व जे.आर.मिधा यांनी उत्तर प्रदेशचे राजकीय नेते डी.पी.यादव यांचा मुलगा विकास व त्याचा चुलतभाऊ विशाल यांना प्रत्येकी पन्नास लाख रूपयांचा दंडही केला आहे. न्यायालयाने सुखदेव पहेलवान या आणखी एका आरोपीचा तुरूंगवासही २५ वर्षे केला आहे.
नितीश कटाराची आई निलम कटारा व दिल्ली पोलिस यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली होती.  आरोपींना फाशीची शिक्षा न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण तुरूंगवास वाढवल्याबाबत समाधान व्यक्त केले. आपण यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करू असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने दिलेली भरपाई आपल्याला नको आहे कारण आपल्या मुलाची किंमत पैशात करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने सांगितले की, विकास हा १० ऑक्टोबर २०११ ते ४ नोव्हेंबर २०११ या काळात रूग्णालयात होता, तो तुरूंगवास म्हणून गणला जाणार नाही. तुरूंगात असताना आरोपी नेहमी रू ग्णालयात कसे जात होते याची केंद्र व राज्य सरकारने चौकशी करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. नितीश कटारा हा उद्योजक होता. १६-१७ फेब्रुवारी २००२ च्या रात्री  त्याचा खून करण्यात आला होता; त्यात विकास, विशाल यादव व सुखदेव पेहेलवान हे जन्मठेप भोगत आहेत. त्यांनी कटारा याचे अपहरण करून त्याला ठार केले होते. डी.पी.यादव यांची कन्या भारती हिच्याशी नितीशचे संबंध होते ते या तिघांना मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी त्याचा खून केला होता.