२० नोव्हेंबरला गांधी मैदानात शपथविधी मोदींना निमंत्रण देण्याबाबतच्या प्रश्नाला बगल

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक साधण्यास नितीशकुमार सज्ज झाले आहेत. नितीशकुमार हे २० नोव्हेंबरला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आधी जदयू आणि नंतर महाआघाडीच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर नितीशकुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
२० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता गांधी मैदानात शपथविधी होईल, असे नितीशकुमार यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. किती मंत्र्यांचा शपथविधी होईल, या प्रष्टद्धr(२२४)्नााला बगल देत नितीशकुमार यांनी बिहारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची मर्यादा ३६ असल्याचे सांगितले. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना शपथविधी सोहळयाला बोलावणार का, असे विचारले असता, याबाबत निर्णय घेऊन प्रसारमाध्यमांना लवकरच कळवू, असे नितीशकुमार म्हणाले.
महाआघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत राजदच्या संसदीय मंडळाच्या प्रमुख राबडी देवी यांनी महाआघाडीच्या विधिमंडळ नेतेपदासाठी नितीशकुमार यांचे नाव सुचवले. त्यास काँग्रेसचे सरचिटणीस सी. पी. जोशी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नितीशकुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी राजद नेते लालूप्रसाद यादव उपस्थित होते. चारा घोटाळाप्रकरणी यादव यांना निवडणूक लढवण्यास बंदी आहे.
त्याआधी जदयूच्या नवनिर्वाचित आमदारांची नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत जदयूचे ज्येष्ठ नेते व मंत्री विजेंद्र प्रसाद यादव यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी नितीशकुमार यांचे नाव सुचवले. त्यास सर्वानी अनुमोदन दिल्यानंतर नितीशकुमार यांची निवड करण्यात आल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. या बैठकीत जदयूचे प्रमुख शरद यादव, सरचिटणीस के. सी. त्यागी आदी उपस्थित होते.