उर्मिला मातोंडकर यांचा आरोप; राजकारण निष्ठेने करण्याची ग्वाही

भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार कार्यसम्राट म्हणून ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात इथे फिरल्यानंतर तो ‘बागुलबुवा’च असल्याचे मला दिसून आले. ज्याला विकास म्हणतात असे काहीच मला उत्तर मुंबईत दिसून आले नाही. त्यामुळे भाजपचा किल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघातून लढताना मला अजिबात दडपण आलेले नाही, असा आत्मविश्वास उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केला.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईत मातोंडकर यांच्यासमोर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविताना दडपण आले का, या प्रश्नाला ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त पत्रकारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी उत्तर दिले. शाळेच्या अभ्यासापासून ते सिनेसृष्टीतील करिअपर्यंत सर्वच गोष्टी मी निष्ठने आणि प्रामाणिकपणे केल्या आहेत. त्यामुळे राजकारणही त्याच निष्ठेने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गेले दोन आठवडे उत्तर मुंबईच्या कानाकोपऱ्यात मी फिरले. आरेतील आदिवासी, दामू नगरमधील झोपडपट्टीवासीय, गावठाण असा परिसर मी पालथा घातला. पण, या ठिकाणी मला विकास दिसला नाही. या शहरात योजना मोठमोठय़ा आल्या. परंतु, रेल्वे स्थानकात महिलांसाठी साधे शौचालयही शोधून सापडत नाही. आपल्याला स्मार्ट सिटीचे गाजर दाखविले गेले. परंतु या शहरात काही ठिकाणी रात्री दोन वाजता उठून पाणी भरावे लागते. विकास याला म्हणायचे का असा, प्रश्न त्यांनी केला.

तुमची आई मुस्लीम की हिंदू?

राजकारणात प्रवेश केल्यापासून द्वेष, मत्सर, सुडाने भरलेल्या संदेशांना मी तोंड देत आहे. अशा पळपुटय़ा, भित्र्या, स्वत:ची भूमिका नसलेल्या लोकांमुळे राजकारणाची पातळी खालावते आहे, अशा शब्दांत पहिल्यांदाच मातोंडकर यांनी ‘ट्रोलिंग’वर आपली भूमिका मांडली. ट्रोलिंगचे एक उदाहरण देताना त्या म्हणाल्या, ‘काही दिवसांपूर्वी मी आईचा वाढदिवस साजरा केला. निवडणुकीच्या धामधुमीत असताना काही क्षण आईसोबत घालविता आले या आनंदात मी तो फोटो सोशल मिडियावर पाठविला. त्यावरही मला ट्रोल केले गेले. तुमची आई मुस्लीम की हिंदूू असा प्रश्न एकाने विचारला. हाही त्यातल्या त्यात सभ्य म्हणायला हवा, इतक्या गलिच्छ व आक्षेपार्ह शब्दांत माझ्यावर शेरेबाजी केली गेली.’ भाजपने आतापर्यंत जितका खर्च आपल्या आयटी सेलवर केला आहे तो देशाच्या विकासावर केला असता तर देशाचे भले झाले असते, अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली.