जॉर्जियामध्ये पात्र व्हिसा आणि आवश्यक सगळी कागदपत्रं असूनही ५६ भारतीयांना जनावरांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप एका महिलेने तिच्या इन्स्टा पोस्टमधून केला आहे. ५६ भारतीय नागरिकांना अत्यंत हीन वागणूक देण्यात आल्याचं या महिलेने म्हटलं आहे. ध्रुवी पटेल या महिलेने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर व्हिडीओ पोस्ट करत आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

ध्रुवी पटेलने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

ध्रुवी पटेल या महिलेच्या पोस्टनुसार जॉर्जियामध्ये ५६ भारतीयांचा अमानुष म्हणता येईल असा छळ करण्यात आला. व्हिसा आणि आवश्यक कागदपत्रं असूनही थंडीत पाच तासांहून अधिक काळ कुडकुडत बसावं लागलं. त्या काळात अन्न-पाणीही मिळालं नाही किंवा प्रसाधनगृहात जाण्याची व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात आली नाही. पासपोर्ट घेऊन अधिकारी गेले त्यानंतर दोन तास आलेच नाहीत. आम्हाला सगळ्यांना फूटपाथवर जनावरांना गोठ्यात बसवतात तसं बसवलं होतं.

आम्हा भारतीयांना देण्यात आली गुन्हेगारांसारखी वागणूक

ध्रुवी पटेल या महिलेने आरोप केला आहे की आम्हाला सगळ्यांना गुन्हेगारांना देतात तशी वागणूक देण्यात आली. इतकंच नाही तर आमचं चित्रीकरणही काही अधिकारी करत होते. पण आम्ही त्यांना ते करण्यापासून थांबवलं. तुमचे व्हिसा चुकीचे आहेत असं आम्हाला त्यांनी कुठलीही कागदपत्रं न तपासता सांगून टाकलं. आम्हाला मिळालेली वागणूक फक्त चुकीची नाही तर अत्यंत घृणास्पद आणि अस्वीकार्य होती. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती आहे की त्यांनी आता या प्रकरणी लक्ष घालावं. या प्रकरणात भारताने खंबीर अशी भूमिका घ्यावी अशीही मागणी ध्रुवी पटेल यांनी आपल्या व्हिडीओतून केली आहे.

जॉर्जियाच्या सीमेवर हा प्रकार घडल्याचा ध्रुवी पटेल यांचा दावा

जॉर्जिया आणि अमेरिका यांच्या सीमेवर असलेल्या साडाख्लो सीमेवर हा प्रकार घडल्याचा आरोप ध्रुवी पटेल या महिलेने केला आहे. अमेरिका आणि जॉर्जिया मधल्या क्रॉसिंगचा हा भाग आहे असंही या महिलेने म्हटलं आहे. दरम्यान या महिलेने असंही म्हटलं आहे की जरा बघा जॉर्जियकडून भारतीयांना कशी वागणूक दिली जाते.

नेटकरी या पोस्टबाबत काय म्हणत आहेत?

ध्रुवी पटेल यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एक युजर म्हणतो आम्हालाही अशाच पद्धतीचा अनुभव काही महिन्यांपूर्वी आला. भारतीयांना तुच्छतेची वागणूक दिली जाते आहे हे योग्य नाही. दुसरा एक युजर म्हणतो, अरे बापरे हे सगळंच फार भयंकर आहे. आम्ही येत्या काही दिवसांमध्ये जॉर्जियाला जाण्याचा विचार करत होतो. पण आता जर तुम्हाला असा अनुभव आला आहे तर काय बरं करावं असा संभ्रम आहे. जॉर्जियामध्ये वर्णभेद केला जातो म्हणून हे घडतं आहे असंही काही युजर्स म्हणत आहेत. २०१९ मध्ये मी जॉर्जियाला गेलो होतो अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे असंही एका युजरने म्हटलं आहे. अशा पद्धतीच्या विविध प्रतिक्रिया या पोस्टवर येत आहेत.