इतर धर्मिय लोक जर अनेक मुलांना जन्म देऊ शकतात. तर हिंदूंना कोणी रोखले आहे? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात केला. हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे भागवतांनी हा सल्ला दिला आहे. यावेळी भागवत म्हणाले की, ”तुम्ही लोक म्हणत आहात की ‘त्यांची’ संख्या वाढत आहे. मात्र हिंदूंना कोणी रोखले आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया यावेळी उंचावल्या गेल्या.
या कार्यक्रमावेळी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांचे म्हणणे केंद्र सरकारपर्यंत पोहचवू असे सांगितले. पण शिक्षकांनीही शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या समस्या कळवाव्या असेही ते म्हणाले. यावेळी शिक्षकांनी आरक्षण व्यवस्था संपविण्याबाबत प्रश्‍न विचारला. त्यावर बोलताना भागवत यांनी व्यवस्था बदलण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.
हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे असे आवाहन यापूर्वी प्रविण तोगडिया, साक्षी महाराज, साध्वी प्राची यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता सरसंघचालकांनीही असे वक्तव्य केल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.