अफगाणिस्तानच्या प्रश्नावर लष्करी तोडगा असू शकत नाही, या मुद्दय़ावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मतैक्य झाले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले, की अफगाणिस्तानात शांतता प्रक्रिया राबवण्यासाठी पाकि स्तान अमेरिकेला मदत करीत आहे.
ट्रम्प यांच्याशी ओव्हल कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर इम्रान खान यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले, की अफगाणिस्तान प्रश्नी लष्करी तोडगा शक्य नाही. जर लष्करी मार्गाचा अवलंब केला तर लाखो लोक मरतील व त्यामुळे यावर शांततामय वाटाघाटी करणे हाच उपाय आहे. तालिबानला आम्ही अफगाणिस्तानातील राज्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे आवाहन करू. त्यातून राजकीय तोडगा निघू शकेल.
खान यांच्या वक्तव्यातील मुद्दा पुढे नेताना ट्रम्प यांनी सांगितले,की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जे मुद्दे मांडले आहेत ती मोठी गोष्ट आहे व ते शंभर टक्के बरोबर आहेत. दोन आठवडय़ात आम्ही अफगाणिस्तान प्रश्नावर बरीच प्रगती केली आहे व त्यात पाकिस्तानने आम्हाला मदत केली आहे.
इम्रान खान यांनी सांगितले,की हा कसोटीचा काळ आहे, आम्हाला दोन्ही देशात शांतता हवी आहे. ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नात पाकिस्तान त्यांच्याबरोबर आहे. पाकिस्तानच्या हेतूंविषयी कुणीही शंका बाळगू नये. अफगाणिस्तानशिवाय अमेरिकेला पाकिस्तानशीही चांगले संबंध हवे आहेत. पंधरा वर्षे आम्ही दहशतवादा विरोधात लढत आहोत व शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात ट्रम्प यांनीही दहशतवादविरोधी लढाई पुढे नेण्यात मदत केली आहे.
अफगाणिस्तानचे युद्ध दहा दिवसात जिंकले असते
ट्रम्प म्हणाले,की अफगाणिस्तानच्या संघर्षांत १ कोटी लोक मारले जाण्याची शक्यता आहे; तसे आम्हाला करायचे नाही. अफगाणिस्तानातील युद्ध अमेरिका जिंकू शकली असती पण अफगाणिस्तान पृथ्वीच्या नकाशावरून नष्ट झाला असता. दहा दिवसात हे युद्ध आम्ही जिंकू शकतो, पण त्या मार्गाने आम्ही जाणार नाही. आम्हाला पोलिसाची भूमिकाही पार पाडायची नाही. १९ वर्षे आम्ही अफगाणिस्तानात आहोत पण हे फार चांगले नाही.