नवी दिल्ली : युक्रेनमध्ये कोणताही भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवला नसल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात आला आहे. रशियाने याबाबत केलेल्या दाव्यानुसार खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवण्यात असून, त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांना रशियन भूमीत जाऊ देण्यास मज्जाव करण्या येत असल्याचा दावा रशियातर्फे करण्यात आला. त्याचे स्पष्ट शब्दांत भारताने खंडन केले आहे. येथे अडकलेल्या सर्व भारतीयांच्या आम्ही संपर्कात असून, कुणालाही ओलीस ठेवल्याचे वृत्त अद्याप आम्हाला मिळालेले नसल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले.

परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी स्पष्ट केले, की कुठल्याही भारतीय विद्यार्थाला ओलीस ठेवल्याचे वृत्त आम्हाला मिळालेले नाही.  खारकीव्ह आणि परिसरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या युक्रेनच्या पश्चिम भागात स्थलांतरीत करण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करावी, अशी आम्ही युक्रेनच्या प्रशासनाला विनंती केली आहे.

बागची यांनी सांगितले, की युक्रेनमधील भारतीय दूतावास युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात असून, युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे काल अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी खारकीव्ह सोडले आहे. या स्थलांतरात कुठलाही भारतीय विद्यार्थी ओलीस ठेवला गेल्याचे वृत्त आम्हाला मिळालेले नाही. युक्रेनलगतच्या रशिया, रोमेनिया, पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि मोलदोव्हा या देशांतील प्रशासनशी आम्ही संपर्कात असून, उत्तम समन्वय साधून भारतीयांचे स्थलांतर सुरक्षित करण्यावर भर देण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनियन प्रशासनाने या संदर्भात घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे हे शक्य होत असल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. मायदेशात परतेपर्यंत विमानांची प्रतीक्ष करणाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य लाभत आहे.