आयटी कंपन्यांमधील कर्मचारी क्लाईंट्सना सेवा देण्यासाठी तासनतास एका जागेवर बसून काम करत असतात. या कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा म्हणून आयटी कंपन्यांकडून विविध सुविधा दिल्या जातात. आकर्षक पगार, भत्ता यासोबतच कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी जिम, स्पोर्ट्स क्लब आणि रेस्टॉरंट अशा सुविधा आयटी कंपन्यांच्या परिसरात उपलब्ध असतात. पण काही जणांना कामाचा क्षीण घालवण्यासाठी मद्य लागते. नोएडातील आयटीपार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील श्रमपरिहाराची निकड होती. त्यामुळे नोएडा आयटी पार्कमध्ये मद्य मिळावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्ष होत होती. वर्ष २०२३ च्या सुरुवातीलाच नोएडा प्राधिकरणाने आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

नोएडा प्राधिकारणाने सरत्या वर्षात २८ डिसेंबर रोजी आयटी पार्कमधील सोयी-सुविधांचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अंतर्भाव करुन एक नवे धोरण तयार करण्यात आले. या नव्या धोरणानुसार आता आयटीपार्कमध्येच मद्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या आयटी पार्कमध्ये जे रेस्टॉरंट आहेत, तिथे मद्य पुरविण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर अधिकृत परवाने आणि इतर बाबींची पुर्तता झाल्यानंतर आयटी पार्कमध्ये बार्सची सुरुवात होणार आहे.

आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी मान्य झाल्यानंतर कर्मचारी आनंद व्यक्त करत आहेत. आयटी मधील कर्मचारी हे तासनतास एका जागेवर बसून काम करत असतात. अशावेळी कंटाळा येणं स्वाभाविक असते. काम संपल्यानंतर कंटाळा घाळवण्यासाठी मद्य काही जणांसाठी उत्तम पर्याय असतो. तसेच आयटी कंपन्यांच्या अनेक क्लाईंट मीटिंग होत असतात. क्लाईंट मीटिंग ‘कोरडी’ ठरत असल्याचीही तक्रार या कंपन्यांची होती. नोएडा प्राधिकरणाच्या नव्या धोरणामुळे आता ही तक्रार देखील राहणार नाही.

आयटी कंपन्यांनी देखील या निर्णयावर समाधान व्यक्त करताना सांगितले की, “आयटी कंपन्यातील काम हे घडाळ्याच्या काट्यावर चालते. आमचे कर्मचारी देश, विदेशातील क्लाईंटसाठी अहोरात्र डेस्कवर एका जागी बसून काम करत असतात. अनेकवेळा छोटासा ब्रेक या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविणारा ठरतो. त्यामुळेच अनेकांनी रेस्टॉरंटमध्ये मद्यही मिळावे, अशी मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोएडा प्राधिकरणाच्या निर्णयानंतर फक्त आयटी कंपन्याच नाही तर गौतम बुद्ध नगरच्या उत्पादन शुल्क विभागानेही आनंद व्यक्त केला. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे आता आमच्या जिल्ह्याचा महसूल वाढेल, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क अधिकारी आरबी सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, “नोएडा हे आयटी कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. गुरुग्राम आणि बंगळुरू मधील आयटी पार्कमध्ये मद्य मिळण्याच्या सुविधा आहेत. केवळ नोएडामध्येच अशी परवानगी नव्हती. बार सुरु करण्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करुन त्यासाठी परवानगी दिली जाईल.”