Hyderabad Kidnapping : हैदराबादच्या एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपासून वेतन मिळाले नव्हते. त्यामुळे नैराश्यात असलेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद किंवा इतर आंदोलन करण्याऐवजी थेट कंपनीच्या मालकाच्या घरावरच हल्लाबोल केला. काही कर्मचाऱ्यांनी आयटी कंपनीच्या संस्थापकाचे अपहरण केले. तर काही जणांनी त्याच्या घरातील लॅपटॉप, गाडी, फोन आणि पासपोर्ट चोरून नेले. या प्रकरणी आता आठ कर्मचाऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
देशात सध्या भीषण बेरोजगारीचे चित्र दिसत आहे. नुकतेच गुजरातमध्ये काही नोकऱ्यांचा अर्ज करण्यासाठी चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी झाली होती. तर ज्या लोकांना नोकरी आहे, त्यांना वेतन मिळत नाही, अशी परिस्थिती असताना कर्मचाऱ्यांनी थेट कायदा हातात घेतला. हैदराबादमध्ये आयटी कंपनीच्या सीईओला ताब्यात घेऊन श्रीसाईलाम रोडवरील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले होते. अपहरण करणारे सर्व कर्मचारी उच्चशिक्षित असून ते कंपनीत महत्त्वाच्या पदावर काम करत होते.
सीईओच्या घरातील सामान कर्मचाऱ्यांनी लंपास केले
१० जुलै रोजी आयटी कंपनीचे संस्थापक रविचंद्रन रेड्डी यांच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन काही लोकांनी घरावर हल्ला केल्याचे सांगितले. या लोकांनी रविचंद्रन आणि त्यांच्या आईला धक्काबुक्की केली. तसेच रेड्डी यांना स्वतःबरोबर नेले. तर काही आरोपींनी त्यांच्या घरातील ८४ लॅपटॉप, १८ मोबाइल फोन आणि गाडी पळवली. रेड्डी यांच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सखोल चौकशी करत रेड्डी यांना कर्मचाऱ्यांच्या तावडीतून सोडविले.
१२०० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले
रविचंद्र रेड्डी यांनी गिगलीझ प्रा. लि. या कंपनीची स्थापना काही वर्षांपूर्वी केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून आर्थिक चणचण सुरू असल्यामुळे त्यांना कंपनीतील १२०० कर्मचाऱ्यांचे पगार देता आलेले नाहीत. हे सर्व कर्मचारी विविध एजन्सीच्या माध्यमातून याठिकाणी कामाला लागले होते. अनेक महिने वेतन न मिळाल्यामुळे सर्व कर्मचारी आणि त्यांना नेमणाऱ्या एजन्सीमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त पी. व्हेकंटगिरी यांनी सांगितले.
नोकरीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून २ ते ३ लाखांची फी घेतली
दरम्यान गिगलीझ कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी रायदुर्गम पोलीस ठाण्यात धाव घेत कंपनीचे मालक रविचंद्र रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रेड्डी यांनी आश्वासन देऊनही त्यांना वेतन मिळालेले नाही, अशी तक्रार करण्यात आली. प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या एजन्सीमधून याठिकाणी कामाला लागला होता. यासाठी त्यांनी एजन्सीलाही २ ते ३ लाखांची फी दिली होती. आता नोकरीही हातून गेल्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना कोणतेही कारण न देता आता कामावरूनही काढून टाकण्यात आलेले आहे.