उत्तर कोरियाने आज आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली असून त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध करण्यात आला आहे, या प्रक्षोभक कृतीनंतर संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर आणखी कडक र्निबध लादण्याचा इशाराही दिला आहे.
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची बैठक बोलावून उत्तर कोरियाच्या या कृतीला प्रतिसाद देण्यासाठी पावले उचलली आहेत. आज सोडलेले क्षेपणास्त्र ५०० कि.मी अंतर ओलांडून गेले असे यॉनहप या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे की, उत्तर कोरियाने आज सोडलेल्या क्षेपणास्त्राचा प्रकार समजलेला नाही पण ते दक्षिण प्याँगन प्रांतातील पुकचांग येथून सोडण्यात आले होते, त्याने ३११ मैल म्हणजे ५०० किमी अंतर पार केले. आमचे लष्कर या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, उत्तर कोरियाच्या या प्रक्षोभक कृतींना तोंड देण्यासाठी आम्ही लष्करी सज्जता ठेवली आहे असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
हाँसाँग १२ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने १४ मे रोजी सोडले होते व ते ७०० कि.मी अंतर पार करून गेले होते. उत्तर कोरियाच्या कुठल्याही क्षेपणास्त्राने आतापर्यंत एवढे अंतर पार केले नव्हते. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा उद्देश हा अमेरिका व जपान यांना अण्वस्त्रांच्या टप्प्यात आणण्याचा आहे.
उत्तर कोरियाने आतापर्यंत पाच अणुचाचण्या केल्या असून आता सहावी चाचणी करण्याचा त्यांचा विचार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र उत्तर कोरियाचा अणू व क्षेपणास्त्र कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत रोखण्याचा निर्धार केला आहे. उत्तर कोरियाकडे जपान व अमेरिकेला टप्प्यात घेऊ शकतील अशी क्षेपणास्त्रे असून हाँगसाँग १२ क्षेपणास्त्राचा पल्ला ४५०० किलोमीटर आहे. अमेरिकेचा पॅसिफिक बेटांवरील ग्वाम नावाचा तळ त्यांच्या टप्प्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची गेल्या मंगळवारी गुप्त बैठक झाली असून त्यात १४ मेच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर उत्तर कोरियावर आणखी र्निबध टाकण्याचे ठरले आहे.