अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. गतवर्षी दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी एकमेकांना संपवण्याची धमकी दिली होती. आता नवीन वर्षाच्या आरंभीच किम जाँगने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे. नवीन वर्षानिमित्त देशाला संबोधित करताना त्यांनी अमेरिकेच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची आपली क्षमता असल्याचे म्हटले. संपूर्ण अमेरिका आपल्या अण्वस्त्रांच्या आवाक्यात आहे, आणि या अण्वस्त्राचे बटन नेहमी माझ्या टेबलावर असते..ही धमकी नव्हे तर सत्य आहे, असेही ते म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/947650460478869504

किमच्या मते, अमेरिका आता उत्तर कोरियाविरोधात कधीच युद्ध पुकारणार नाही. आम्ही अमेरिकेच्या सर्वच भागांवर अण्वस्त्रांनी हल्ला करण्याची क्षमता विकसित केली आहे. दरम्यान, त्यांनी दक्षिण कोरियाशी आपण चर्चेस तयार असल्याचेही म्हटले. चर्चेच्या माध्यमातून एकमेकांमधील तणाव दूर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाचे खेळाडू पाठवण्याबाबत किम म्हणाले की, दोन्ही कोरियाचे अधिकारी लवकरच एकमेकांना भेटतील आणि यावर विचार करतील. या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोरियन देशांना चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे. प्योंगयांग आणि सियाल यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत. उत्तर कोरियाच्या सुरक्षेला जेव्हा धोका असेल, असे जाणवेल तेव्हाच आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू असा इशारा देखील त्यांनी दिला.