उच्च शक्ती क्षमता असलेल्या नवीन प्रकारच्या अग्निबाण इंजिनाची चाचणी उत्तर कोरियाने घेतली असून, या देशाचे नेते किम जोंग उन यांनी ही देशाच्या अवकाश कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कामगिरी असल्याचे म्हटले आहे.

किम यांनी शनिवारी सोहे प्रक्षेपण स्थळावर जाऊन या चाचणीच्या वेळी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले. नवीन इंजिनाचा जोर व क्षमता तसेच नियंत्रण व्यवस्थेची विश्वासार्हता, रचनात्मक सुरक्षा यांची तपासणी यात करण्यात आली. आजच्या आमच्या कामगिरीचे परिणाम जगाला आणखी काही दिवसांनी समजतील व ही चाचणी म्हणजे देशाच्या अग्निबाण उद्योगात १८ मार्चची चाचणी म्हणून ओळखली जाईल. या अग्निबाण इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने आता उत्तर कोरियाला अवकाश क्षेत्रात उपग्रह बांधणी व त्यांचे प्रक्षेपण करण्यात मोठा फायदा होणार आहे.

उत्तर कोरियाने अशा क्षेपणास्त्र व अग्निबाण चाचण्या करण्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. आमचा उपग्रह कार्यक्रम शांततामय आहे असा दावा उत्तर कोरियाने केला आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाच वर्षांच्या कार्यक्रमात आम्ही आणखी पृथ्वी निरीक्षण उपग्रह सोडणार आहोत. देशाचा पहिला भूस्थिर उपग्रह सोडला जाणार असून ती तंत्रज्ञानातील मोठी प्रगती असणार आहे. भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी आधीच्या पेक्षा जास्त शक्तिशाली इंजिनाची आवश्यकता आहे.

उत्तर कोरियाने केलेल्या दाव्यानुसार पुढील दहा वर्षांत चंद्रावर यान सोडण्याइतपत प्रगती केली जाणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन हे अलीकडेच चीन दौऱ्यावर गेले असता चीन व अमेरिका यांच्यात उत्तर कोरियाच्या मुसक्या बांधण्यावर मतैक्य झाल्याच्या बातम्या असताना उत्तर कोरियाने ही प्रक्षोभक कृती केले आहे.

उत्तर कोरियाने अण्वस्त्र व क्षेपणास्त्र कार्यक्रम जोरात चालवला असून, त्यामुळे अमेरिका व दक्षिण कोरिया या देशांना धोका आहे.