नवी दिल्ली : राज्यांच्या निधीवाटपावरून सुरू असलेला उत्तर-दक्षिण वाद मंगळवारी आणखी चिघळला. ‘द्रमुक’चे खासदार टी. आर. बालू यांनी केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरूगन यांच्यावर केलेल्या टिपण्णीमुळे दलित समाजाचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला. या प्रकरणी बालू यांच्या माफीची मागणी भाजपने केली.तमिळनाडूमध्ये डिसेंबरमध्ये आलेल्या दोन चक्रीवादळासंदर्भात बालू यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुरूगन यांना उद्देशून, तुम्ही मंत्री व खासदार होण्यासाठी अयोग्य असल्याची टिप्पणी बालू यांनी केली. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला.
दोन्ही चक्रीवादळामुळे तमिळनाडूचे मोठे नुकसान झाले असून केंद्राने पुरेसे आर्थिक साह्य दिलेले नाही, असा मुद्दा मांडून बालू यांनी बिगरभाजप राज्यांच्या निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याच्या कथित मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. बालू यांच्या प्रश्नावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी, निधीवाटपामध्ये कोणताही भेदभाव होत नसल्याचे स्पष्ट केले. विरोधक फुटीरतेचा राजकीय अजेंडा घेऊन केंद्र सरकारवर आरोप करत असल्याचेही राय म्हणाले.
हेही वाचा >>>भारत-म्यानमारच्या सीमेवर बांधणार तब्बल १६०० किमीचं कुंपण, मोदी सरकारचा निर्णय
तामिळनाडूमध्ये डिसेंबरमध्ये आलेला पूर हा हवामान केंद्राच्या पूर्वसूचना यंत्रणेच्या पूर्ण अपयशाचा परिणाम होता. त्यामुळे एक हजारहून अधिक लोक रेल्वेमध्येच अडकून पडले होते, असा मुद्दा बालू यांनी उपस्थित केला. त्यानंतर राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी बालूंना अडवण्याचा प्रयत्न केला. पण, बालूंनी मुरुगन यांनाच धारेवर धरले. ‘तुम्ही विनाकारण ढवळाढवळ करू नका. तुम्ही खासदार आणि मंत्री होण्यासाठी अयोग्य आहात! तुम्ही खाली बसा’, असे बालू म्हणाले.
बालूंच्या या टिप्पणीमुळे सत्ताधारी सदस्य संतप्त झाले. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी हस्तक्षेप करत बालूंच्या माफीची मागणी केली. ‘तुम्ही आमच्या मंत्र्याला अयोग्य म्हणू शकत नाही, असे मेघवाल म्हणाले. बालूंची टिप्पणी इतिवृत्तांतून काढून टाकण्याची विनंतीही त्यांनी केली. त्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी मुरूगन यांच्या बाजूने उभे राहिले. ‘तुम्ही मंत्र्यांना अयोग्य कसे म्हणू शकता? तुम्ही दलित मंत्र्याला अयोग्य ठरवत आहात. हा दलित समजाचा अपमान करत आहे’, असे जोशी म्हणाले.
हेही वाचा >>>सासरे नारायण मूर्तींमुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आरोपांच्या फेऱ्यात का अडकले?
आज काँग्रेसचे, उद्या डावे-द्रमुकचे आंदोलन
या प्रकरणामुळे दक्षिणेकडील राज्यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निधी वाटपावरून होणाऱ्या कथित भेदभावाविरोधात कर्नाटक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर केरळमधील डाव्या आघाडीच्या वतीने गुरुवारी याच मुद्दय़ावर आंदोलन केले जाईल. या आंदोलनाला ‘द्रमुक’चे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी पाठिंबा दिला आहे.