‘‘मी भारत आणि अमेरिका या राष्ट्रांविरोधात नाही, मात्र या राष्ट्रांच्या धोरणांना माझा विरोध आहे,’’ असे उद्गार पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या राजकीय पक्षाचा नेता इम्रान खान यांनी काढले.
एक्स्प्रेस ट्रिबून या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. या मुलाखतीत इम्रान खान यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राजकीय वक्तव्यांकडेच त्यांचा जास्त कल होता.  ‘‘अमेरिका हा दुटप्पी भूमिका घेणारा देश आहे. अमेरिकेने अफगाण तालिबानशी चर्चा थांबवली आहे. पाकिस्तानातही त्यांनी ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’शी चर्चा थांबवली होती. अमेरिका एकीकडे तालिबानविरोधात कारवाई करते, दुसरीकडे त्यांच्याशी सुरू असलेली चर्चा थांबवते. हे त्यांचे धोरण अयोग्य आहे,’’ असे इम्रान यांनी सांगितले. पाकिस्तानच्या दुर्गम भागांत अमेरिका ड्रोन हल्ले करते, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. जर माझा पक्ष सत्तेवर आला तर ड्रोन हल्ले करण्याची हिंमतही अमेरिकेची होणार नाही, असे इम्रान म्हणाले. इम्रान खानच्या या नव्या चौकार, षटकारांमुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारताच्या धोरणांनाही विरोध असल्याचे इम्रान म्हणाले. मात्र याबाबत विस्तृत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.