कोलकाता ; प्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.‘मधुकरी’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले होते.  गुहा हे कोविड नंतरच्या गुंतागुंतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले.

त्यांच्या कादंबऱ्यांतून निसर्गाशी सान्निध्य जाणवत असे. पूर्व भारतातील जंगलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. कोविड नंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच रविवारी ११.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना एप्रिलमध्ये करोना झाला होता. त्यावेळी ते ३३ दिवस रुग्णालयात होते.

गुहा यांच्या पश्चात दोन मुली असून त्यांच्या पत्नी रितू गुहा या रबींद्र संगीतातील तज्ज्ञ होत्या. त्यांचे २००१ मध्ये निधन झाले होते. गुहा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपण रंगपूर व बारीसाल या पूर्व बंगालमधील भागात गेले. बालपणीच्या आठवणींचा त्यांच्यावर ठसा होता.

त्यांना आनंद पुरस्कारासह शिरोमण पुरस्कार, शरत पुरस्कार मिळाले होते. त्यांनी मधुकरी, कोएलर कच्छे, सोबीनॉय निबेदॉन  ही त्यांची पुस्तके गाजली. बाबा होवा व स्वामी होवा या त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर ‘डिक्शनरी’ हा चित्रपट काढण्यात आला होता. मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. त्यात रिजुदा हे त्यांचे पात्र जास्त भावले. पुस्तक मेळ्यात ते येत असत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीत आहेत.