४८ तासांत खुलासा सादर करण्याचे समितीचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिर्डी येथील एका स्थानिक केबल नेटवर्कवर ‘डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी आणि एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल अशी शक्यता वर्तवणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटीस बजावली आहे. सदर बातमी प्रसारित करण्यास आपली अनुमती होती किंवा कसे, याबाबत ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा सदर वृत्त ‘पेडन्यूज’ म्हणून का गृहित धरु  नये आणि त्याचा खर्च आपल्या निवडणूक खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी विचारणा समितीने केली आहे.

समितीचे अध्यक्ष तथा नगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही नोटीस बजावली आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एकाच स्वरु पाच्या, एकांगी आणि एकाच उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडावा, या अनुषंगाने आलेल्या बातम्या ‘पेडन्यूज’ म्हणून मानल्या जातात. त्याच अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती काम करते.

शिर्डीतील एका केबल नेटवर्कवरून ‘डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची बातमी श्रीरामपूर येथील प्रतिनिधीने प्रसारित केली होती. सदर बातमी यू टय़ूब चॅनेलवर अपलोड करण्यात आली होती. सदर वृत्तातील मजकूर हा एकांगी असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय, सदर केबल नेटवर्कसाठी बातमी प्रसारणाचा परवाना आहे का, ज्या उमेदवाराशी संबंधित ही बातमी एकांगी स्वरु पाची आहे, त्यांच्या पूर्वसंमतीने ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे का, अशी विचारणा समितीने या केबल नेटवर्ककडेही केली असून त्यांना ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to bjp candidate vikhe in paid news
First published on: 13-04-2019 at 01:09 IST