पाकिस्तानचे माजी पंतप्रधान रझा परवेज अशरफ यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. आपल्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमावा, अशी सूचना करून अशरफ यांनी न्यायालयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
मुख्य न्यायमूर्ती इफ्तिकार चौधरी अध्यक्ष असलेल्या त्रिसदस्यीय पीठाने त्यांना नोटीस बजावली असून त्यांना दोन आठवडय़ांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राजा यांनी आपल्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमावा या मागणीसाठी न्यायालयाला पत्र पाठविले होते. मात्र या प्रकरणासंबंधीचा निकाल यापूर्वीच रझा यांनी मान्य केला असून या निर्णयासंबंधी पुनर्विचार करण्याची आवश्यकता नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारनेही यासंबंधीची पुनर्याचिका मागे घेतली असल्याचे चौधरी यांनी सांगितले.