जनरल तिकिटासाठी आता रेल्वे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तिकीट काऊंटरवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने यूटीएस अॅपच्या माध्यमातून दिल्लीतील अनेक स्थानकांना जोडण्याचे काम सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून लोक घरबसल्या आपले अनारक्षित तिकीट काढू शकतात. सध्या नवी दिल्ली स्थानकावरच ही सुविधा उपलब्ध होती. आता या सेवेचा विस्तार केला जात आहे. मुंबईत ही सेवा याआधीच सुरू करण्यात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचा प्रारंभ केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अॅपच्या माध्यमातून प्रवासी घरबसल्या अनारक्षित तिकीट बुक करू शकतात. स्थानकावर आल्यानंतर ते व्हेंडिंग मशीनवरून आपल्या तिकिटाची प्रिंट घेऊ शकतात. रेल्वेने इतर स्थानकावर याची चाचणी सुरू केली आहे. अॅपमध्ये अनेक स्थानकं जोडली जात आहेत. दिल्लीतील अनेक स्थानकं यामध्ये दिसत आहेत. रेल्वेच्या मते, चाचणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच यूटीएस अॅपचे अपडेटेड व्हर्जन प्रवाशांसाठी उपलब्ध केले जाईल. चाचणी शेवटच्या टप्प्यात असल्याचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.

दिल्लीत यूटीएस अॅपची सुरूवात २०१५ मध्ये झाली होती. त्यावेळी दिल्ली-पलवल दरम्यान पेपरलेस तिकीटचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये गाझियाबाद मार्गावर ही सुविधा सुरू करण्यात आली. पेपरलेस तिकीटमध्ये प्रवासी फक्त त्या मार्गावरील तिकीट काढू शकतात. पण पेपर तिकिटासाठी देशातील कोणत्याही स्थानकासाठी तिकीट बुक करू शकतो. प्रवाशांना प्रिंट काढण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून दिल्ली डिव्हिजनच्या ५० हून अधिक स्थानकांवर १५० हून अधिक एटीव्हीएम मशीन लावण्यात आले आहेत. यावर प्रिंट तिकीटचा पर्याय उपलब्ध असेल.

यासाठी प्रवाशाला गुगल प्ले स्टोअरमधून यूटीएस ऑन मोबाइल अॅप डाऊनलोड करता येऊ शकतो. त्यानंतर आपला मोबाइल नंबर रजिस्टर करून अॅपवर आपला आयडी तयार करता येईल. नंतर पेपरलेस ऐवजी पेपर तिकीटचा पर्याय निवडावा लागेल. दिल्लीतील आनंद विहार, दिल्ली कंटोन्मेंट, दिल्ली जंक्शन, दिल्ली किशनगंज, दिल्ली सराय रोहिल्ला, दिल्ली शाहदरा, हजरत निजामुद्दीन, ओखला, नवी दिल्ली, पालम, सब्जी मंडी, शकूर बस्ती, शिवाजी ब्रिज, तुघलकाबाद आणि विवेक विहार स्थानके यूटीएस अॅपशी जोडण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now general ticket of the train through the app
First published on: 20-11-2017 at 11:13 IST