भारतीय सैन्यातील जवानांना आता व्हॉट्स अॅपवरही कामाविषयीच्या तक्रारी करता येणार आहे. सैन्याने शुक्रवारी संध्याकाळी एक मोबाईल नंबर जाहीर केला असून या क्रमांकावर आलेल्या तक्रारी थेट लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यापर्यंत पोहोचणार आहे.

सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या पाठोपाठ लष्कराच्या जवानाने त्यांना मिळणा-या सुविधांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले होते. या व्हिडीओमुळे संरक्षण मंत्रालय आणि गृहमंत्रालयाची नाचक्की झाली होती. या घटनांची दखल घेत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जवानांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. सैन्याने +९१९६४३ ३००००८ हा क्रमांक प्रसिद्ध केला असून या क्रमांकावर सैन्यातील सुमारे १२ लाख जवानांना तक्रार करता येईल.

जवानांच्या तक्रारीविषयी सध्याची पद्धतही उत्तम पद्धतीने काम करत आहे. पण आपली तक्रार थेट लष्कर प्रमुखांपर्यंत पोहोचवण्याची जवानाची इच्छा असल्यास त्यांना या क्रमांकाचा उपयोग होईल असे सैन्यातील सूत्रांनी सांगितले. मात्र या क्रमांकाचा खरंच उपयोग होईल का असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. या क्रमांकावर दिवसभर असंख्य मेसेज येतील. जगाच्या कानाकोप-यातून यावर मेसेज येऊ शकतात. याशिवाय असंख्य व्हिडीओ आणि फोटोही या क्रमांकावर शेअर होऊ शकतात. त्यामुळे या सर्वांवर लक्ष ठेवणे कठीण असल्याचे जाणकार सांगतात.

लष्कराच्या जवानाने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केल्यावर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जवानांना सोशल मीडियाचा वापर करु नका असे आदेश दिले होते. जवानांना काही समस्या असल्यास त्यांनी त्यांचे प्रश्न अंतर्गत स्तरावर उपस्थित करावेत. मात्र त्यांनी समाज माध्यमांचा वापर करु नये. जवानांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधावा. जवानांनी थेट माझ्यासोबत बोलावे,’ असे रावत यांनी म्हटले होते. आता व्हॉट्स अॅप क्रमांकाचा फायदा जवानांना होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.