जम्मू-काश्मीरच्या नौगाम भागात शनिवारी रात्री सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. तर तीन जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. दहशतवाद्यांकडून चार बंदुका आणि युद्धसामग्री जप्त करण्यात आली. काश्मीरच्या उत्तर भागात ही घुसखोरीची घटना घडली.

कुपवाडा जिल्ह्यात नौगाम सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका गटाला भारतीय सैनिकांनी हटकलं असता ही चकमक सुरू झाली होती. चकमक सुरू झाल्यानंतर शनिवारी दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पुढे अतिरिक्त कुमक दाखल करून शोध मोहिम राबवण्यात आली. यात आतापर्यंत चार दहशतवादी ठार झाले असल्याचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.