लंडन/नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती आणि अनिवासी भारतीय लॉर्ड स्वराज पॉल (९४) यांचे लंडनमध्ये गुरुवारी निधन झाले. यशस्वी उद्योजक आणि परोपकारी वृत्तीचे म्हणून त्यांची ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरवर्षी करण्यात येणाऱ्या ‘संडे टाइम्स रिच लिस्ट’मध्ये त्यांची संपत्ती २ अब्ज पौंडांची होती. ब्रिटनमध्ये ८१ वे श्रीमंत व्यक्ती होते.
लॉर्ड स्वराज पॉल यांनी ब्रिटनमधील ‘कपारो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ची स्थापना केली होती. काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्राणज्योत मालविली. ‘पॉल यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. उद्योग, परोपकार, ब्रिटनमधील सार्वजनिक सेवा आणि भारताबरोबर उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे त्यांचे योगदान कायमच लक्षात राहील,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
स्वराज ब्रिटनच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होते. प्रकृती ठीक नसली, तरी ते नियमित सभागृहात जात असत. त्यांच्या निधनानंतर वरिष्ठ सभागृहानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या कपारो उद्योगसमूहाचे मुख्यालय लंडनमध्ये होते. जगभरात ४० ठिकाणांहून त्यांचा व्यवसाय चाले. ब्रिटनसह, अमेरिका, भारत, पश्चिम आशियामध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आहे. पुत्र आकाश पॉल हे ‘कपारो इंडिया’चे अध्यक्ष आणि ‘कपारो ग्रुप’चे संचालक आहेत. गेल्या वर्षी आकाश यांना वूल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाने स्वराज पॉल यांच्या हस्ते उद्योगविश्वातील कामगिरीसाठी मानद डॉक्टर पदवी बहाल केली.
पॉल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला. त्यांचे वडील प्यारे लाल यांचा स्टीलची भांडी बनविण्याचा छोटा उद्योग होता. छोट्या बादल्यांसह शेतीची अवजारेही ते बनवत. घरातील वातावरणामुळे उद्योग जगताशी त्यांचा लहान वयातच परिचय झाला. जालंधरमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. तर, पंजाब विद्यापीठातून १९४९ मध्ये ते पदवीधर झाले. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेतल्यानंतर उद्योग सांभाळण्यासाठी ते पुन्हा भारतात आले.
‘अपीजय सुरेंद्र ग्रुप’ हे त्यांच्या भारतातील उद्योगाचे नाव होते. १९६६ मध्ये त्यांची मुलगी अंबिकावरील उपचारांसाठी ते ब्रिटनला गेले. तेथेच ते स्थायिक झाले. त्यांच्या मुलीचा वयाच्या चौथ्या वर्षी ल्युकेमियाने मृत्यू झाला. पॉल यांनी ‘अंबिका पॉल फाउंडेशन’ या परोपकारी संस्थेची नंतर स्थापना केली. लहान मुले आणि तरुणांचे स्वास्थ्य उत्तम राहावे, यासाठी ही संस्था शिक्षण आणि आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून काम करीत असे. लंडनमधील ‘अंबिका पॉल चिल्ड्रन्स झू’ची स्थापना नंतर झाली. २०१५ मध्ये त्यांचा मुलगा अंगद आणि २०२२ मध्ये त्यांची पत्नी अरुणा यांचे निधन झाले. फेब्रुवारी २०२३ मध्ये लंडनमध्ये पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी ‘लेडी अरुणा स्वराज पॉल हॉल’ची उभारणी केली.
इंडो-ब्रिटिश असोसिएशनची स्थापना
भारत-ब्रिटनमधील संबंध चांगले राहावेत, यासाठी पॉल यांनी इंडो-ब्रिटिश असोसिएशनची १९७५ मध्ये स्थापना केली. १९७८ मध्ये त्यांचा ब्रिटिश राणीने गौरव केला. नंतर ते ब्रिटनच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले. १९८३ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा नागरी सन्मान बहाल केला.