scorecardresearch

अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ठरला ‘दिल्ली प्लॅन’; सात देशांच्या NSAची पंतप्रधानांनी घेतली भेट

बैठकीचे अध्यक्ष असलेले अजित डोवाल यांनी अफगाणिस्तानमधील घडामोडी केवळ शेजारी आणि प्रदेशासाठीही महत्त्वपूर्ण आहेत असे म्हटले.

NSA Ajit Doval Regional Security Dialogue on Afghanistan in Delhi
(फोटो सौजन्य – ANI)

दिल्लीत आठ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाली आहे. अफगाणिस्तान कट्टरतावाद, अतिरेकीपासून मुक्त राहील आणि कधीही जागतिक दहशतवादाचे स्रोत बनू नये याची खात्री करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. याशिवाय अफगाण समाजातील सर्व घटकांना भेदभावरहित आणि न्याय्य मानवतावादी मदत मिळवून देण्यावरही सहमती झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बहुपक्षीय बैठकीत इराण, रशिया, कझाकिस्तान, कारगेस प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किंवा सुरक्षा परिषदेचे सचिव उपस्थित होते. भारताच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पाकिस्तान आणि चीनलाही निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी त्यात सहभाग घेतला नाही. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती.

बैठकीचे अध्यक्ष असलेले अजित डोवाल यांनी अफगाणिस्तानमधील अलीकडच्या घडामोडी केवळ त्या देशातील लोकांसाठीच नाही तर शेजारी आणि प्रदेशासाठीही महत्त्वपूर्ण आहेत असे म्हटले. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर प्रादेशिक देशांमध्ये जवळून सल्लामसलत, अधिक सहकार्य आणि समन्वय साधण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले. या बैठकीत ज्या सात देशांचे सुरक्षा सल्लागार सहभागी झाला आहे त्यात रशिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.

या बैठकीत दिल्ली जाहीरनामा जारी करण्यात आला. जाहीरनाम्यानुसार, बैठकीत अफगाणिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती, विशेषतः आणि त्याचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम यावर चर्चा झाली. सर्व बाजूंनी त्या देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, दहशतवादामुळे निर्माण होणारे धोके, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखणे, तसेच अफगाण लोकांना मानवतावादी मदतीची गरज यावर भर दिला.

बैठकीदरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी शांततापूर्ण, सुरक्षित आणि स्थिर अफगाणिस्तानसाठी त्यांच्या भक्कम समर्थनाचा पुनरुच्चार केला. यासोबतच त्यांनी सार्वभौमत्व, एकता आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याबाबत आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याबाबत सांगितले. अफगाणिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती ढासळल्यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. यासोबतच कुंदुज, कंदहार आणि काबूल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा या बैठकीत निषेध करण्यात आला.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांचे नियोजन आणि निधी पुरवण्यासाठी केला जाऊ नये, यावर दिल्ली जाहीरनाम्यात यावेळी भर देण्यात आला. जाहीरनाम्यात, सर्व बाजूंनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि त्याचा मुकाबला करण्याच्या त्यांच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. यामध्ये दहशतवाद आणि इतर पायाभूत सुविधांना निधी पुरवणे आणि अतिरेकी संपवणे यांचा समावेश आहे.

अफगाणिस्तानातील लोकांना तात्काळ मानवतावादी मदत देण्याची गरजही असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्याच बरोबर, प्रत्येकाने कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि अफगाणिस्तानला मदत देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर दहशतवाद, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी या वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक सहकार्यासाठी समान दृष्टीकोन मजबूत करण्याच्या उद्देशाने भारत या बैठकीचे आयोजन केले होते. अफगाणिस्तान हे जागतिक दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान बनणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सर्वांनी यावेळी सांगितले. अतिरेकी, फुटीरतावाद आणि तस्करीच्या विरोधात सर्वांनी सामूहिक सहकार्याचे आवाहन केले. दिल्लीतील या घोषणेने अफगाणिस्तानमध्ये खरोखरच खुले आणि सर्वसमावेशक सरकारच्या गरजेवर जोर दिला.

बैठकीची सुरुवात करताना डोवाल म्हणाले, “आम्ही आज अफगाणिस्तानशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटत आहोत. त्या देशातील घडामोडींवर सर्वांचे बारीक लक्ष आहे. याचे केवळ अफगाणिस्तानच्या लोकांसाठीच नाही तर त्याच्या शेजारी आणि प्रदेशावर देखील महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत.

बैठक सुरू होण्यापूर्वी डोवाल यांनी सात देशांसोबतची ही चर्चा फलदायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली. “आपली जवळून चर्चेची वेळ आली आहे. मला खात्री आहे की आपली चर्चा अफगाण लोकांना मदत करण्यास आणि आपली सामूहिक सुरक्षा वाढविण्यात योगदान देईल, असे डोवाल म्हणाले.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 16:42 IST

संबंधित बातम्या