देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. दरम्यान, करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. दरम्यान, देशातील कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी  सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतात करोनाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु परिस्थितीला हलक्यात घेऊ नका, असे त्यांनी सांगितले आहे. 

देशात करोनाची परिस्थिती स्थिर होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्यात आपण आहोत. मात्र, दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता. या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका, असे पॉल यांनी सीएनबीसी-टीवी १८ शी बोलतांना सांगितले. 

करोनाबाबत केंद्राच्या योजना सांगतांना पॉल म्हणाले, सर्वप्रथम वयस्कर नागरिकांचे लसीकरणाला प्राथमिकता देण्यात येत आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाच्या बाबतीत आम्ही केंद्राच्या सुचनेची वाट पाहत आहोत. कोव्हॅक्सिनला मान्यता कधी मिळणार याकडे आमचे लक्ष आहे.

देशातील २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या वयोगटासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे. भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या देशभरात घेण्यात आल्या होत्या. भारत बायोटेकने दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा तपशील केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेकडे सादर केला होता.


मुलांसाठी लशी, चाचण्या..

* याआधी भारताच्या औषध महानियंत्रकांनी १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी दिली होती.

* तसेच १ सप्टेंबरला हैदराबादच्या बायोलॉजिकल ई-लिमिटेड कंपनीला ५ ते १८ वयोगटातील मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लस चाचण्या करण्यास औषध महानियंत्रकांनी परवानी दिली होती.

* जुलैमध्ये औषध महानियंत्रकांनी २ ते १७ वयोगटासाठी कोव्होव्हॅक्स लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास सीरम इन्स्टिटय़ूटला परवानगी दिली होती.