चीनमध्ये प्रथमच करोनाने एकही बळी गेला नसल्याचे सांगण्यात आले. जानेवारीपासून चीनमधील करोना बाधित व मृतांचे आकडे वाढत गेले होते.

साथीची परमोच्च अवस्था गाठली गेल्यानंतर ते कमी झाले पण मृतांचा आतापर्यंत आकडा शून्यावर आला नव्हता. असे असले तरी ३२ नवीन परदेशी रुग्ण सापडले असून एकूण परदेशी रुग्णांची संख्या आता ९८३ झाली आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, सोमवारी चीनमध्ये करोनाने एकही बळी गेला नाही. चीनमधील एकूण मृतांची संख्या त्यामुळे ३३३१ आहे. चीनमध्ये दोन महिने करोनाने थैमान घातले त्यात हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहानमध्ये सर्वाधिक बळी गेले होते.

सोमवारच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या ८१७४० असून १२४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७७१६७ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. स्थानिक संक्रमणाचा एकही रुग्ण सोमवारी सापडला नसून परदेशातून आलेले ३२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परदेशी रुग्णांची संख्या आता ९८३ झाली आहे. एकूण ३० रुग्ण हे लक्षणे नसलेले असून त्यात नऊ परदेशी रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या आठवडय़ापासून चीनने लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्याही जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण हे छुपे रोगवाहक असतात. लक्षणे नसलेल्या एकूण १०३३ जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. चीनने प्रथमच करोनाचा घटनाक्रम जाहीर केला त्यात डिसेंबर २०१९  च्या अखेरीस पहिला रुग्ण वुहानमध्ये सापडल्याचे म्हटले असून त्याची नोंद न्यूमोनिया सदृश रोग अशी करण्यात आली होती यात त्यांनी करोनाचा विषाणू कुठून आला हे मात्र सांगण्याचे टाळले आहे.