ऑस्ट्रेलियातील नभोवाणी निवेदकांनी ब्रिटनचे युवराज-राणी असल्याचे भासवत लंडनच्या ‘किंग एडवर्ड सेव्हन हॉस्पीटल’मध्ये उपचार घेत असलेली युवराज्ञी केट मिडलटन हिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि भारतीय वंशाची परिचारिका जेसिंथा सालढाणा हिने भाबडेपणाने उपचार कक्षात दूरध्वनी जोडून दिला आणि तिच्या संवादासह हा भाग प्रसारितही झाला. हा दूरध्वनी म्हणजे फसवेगिरी होती, हे उमगताच हादरलेल्या जेसिंथाने आत्महत्या केल्याने सोमवारी जगभरात या प्रकाराबद्दल संतापाची लाट उसळली असून या डीजेंची निर्लज्ज पाठराखण करणाऱ्या नभोवाणी वाहिनीला अखेर त्यांच्यावर कारवाई करावी लागली आहे. या दोघांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा ब्रिटनचा प्रयत्न आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ‘टू डे एफएम’वरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे डीजे निवेदक मेल ग्रेग आणि निवेदिका मिशेल ख्रिश्चन या दोघांनी गेल्या आठवडय़ात युवराज चार्ल्स आणि सम्राज्ञी एलिझाबेथ असल्याचे भासवत गर्भवती युवराज्ञी केट हिच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयास पहाटे दूरध्वनी केला. राजघराण्यातून थेट दूरध्वनी आल्याचे समजून परिचारिका जेसिंथा हिने तातडीने हा दूरध्वनी केटवर उपचार सुरू असलेल्या कक्षातील आपल्या सहकाऱ्यांकडे जोडून दिला. तेथून जी माहिती दिली गेली ती या वाहिनीवरून प्रसारित होताच एकच खळबळ उडाली. रुग्णावरील उपचारांची माहिती अत्यंत खाजगी आणि गोपनीय मानली जात असताना कुणीतरी गंमत म्हणून ती इतक्या सवंग पद्धतीने उघड करवली आणि आपणही त्यांच्याकडून फसविले गेलो, या भावनेने जेसिंथा खचून गेली आणि तिने आत्महत्या केली.
ब्रिटन सरकारने मात्र ऑस्ट्रेलियाकडे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याबाबत संपर्क साधला आहे. झाल्या प्रकाराबद्दल या दोघा डीजेंनी जेसिंथाच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. आम्ही दूरध्वनी केला तेव्हा आमची शब्दोच्चारणाची ऑस्ट्रेलियन ढब लक्षात घेता कुणाला तरी संशय येईलच, तो खरच राजप्रासादातून आला आहे का, याची खातरजमा होईल आणि आम्हाला उडवून लावले जाईल, असे आम्हाला वाटत होते, असे या डीजेंनी वृत्तवाहिन्यांना सांगितले.    
जेसिंथा ही मूळची मंगळूरची असून उडुपी येथील बेनेडिक्ट बाबरेझा हिच्याशी तिचा विवाह झाला होता. हे दोघे आपल्या मुला-मुलीसह दहा वर्षांपूर्वीच लंडनला स्थलांतरित झाले होते. दोघे पती-पत्नी अत्यंत प्रेमळ आणि दुसऱ्यांना मदत करणारे होते, असे शेजारच्यांनी सांगितले. या रुग्णालयात राजघराण्यातील लोकांवर उपचार होतात आणि ब्रिटनच्या सम्राज्ञीची परिचारिका म्हणून जेसिंथाला वेगळाच मान होता, असेही तिच्या आप्तस्वकीयांनी सांगितले. तिच्या पार्थिवाचे दफन भारतात तिच्या जन्मगावी होईल, असे सांगण्यात आले.