सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात लोकप्रिय ब्युटी स्टार्टअप म्हणजेच सौंदर्यप्रसाधने निर्मिती क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या ‘नायका’च्या मालकीण फाल्गुनी नायर यांनी आज एक अनोखा पराक्रम केलाय. ‘नायका’ची अर्धी मालकी असणाऱ्या फाल्गुनी यांचा समावेश श्रीमंतांच्या यादीमध्ये झाला असून बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ८९ टक्क्यांनी वाढ पहायला मिळालीय. याच शेअर बाजारामधील भरभराटीमुळे फाल्गुनी यांची एकूण संपत्ती ६.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी झालीय. स्वत:च्या जोरावर सर्वाधिक श्रीमंत महिला होण्याचा मान यामुळे फाल्गुनी यांनी मिळवल्याचं ब्लुमबर्ग बिलेनिर्यस इंडेक्सने म्हटलं आहे.

महिला नेतृत्व करत असणारी एफएसएन ई कॉर्मर्स व्हेंचर्स ही भारतातील पहिली अशी कंपनी ठरलीय जी स्टॉक मार्केटमध्ये दाखल झालीय. कंपनीच्या शेअर्सची नुकतीच विक्री करण्यात आली ज्यामधून ५३.५ बिलियन रुपये म्हणजेच ७२२ मिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा करण्यात आलाय. मुंबईमध्ये सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी या शेअर्सची किंमत तब्बल ७८ टक्क्यांनी वधारलेली पहायला मिळाली.

फाल्गुनी यांनी वयाची ५० ओलांडण्याच्या काही महिने आधी म्हणजेच २०१२ च्या पहिल्या काही महिन्यांमध्येच ‘नायका’ कंपनीची स्थापना केली. महिलांसाठी प्रोडक्ट विकणाऱ्या या कंपनीचं नाव ‘नायिका’ या संस्कृत शब्दापासून ठेवण्यात आलेलं आहे. फाल्गुनी या पूर्वी इनव्हेसमेंट बॅकिंगमध्ये होत्या. ‘नायका’ बाजारमध्ये येण्याआधी भारतामधील महिला या जवळच्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्येच ब्युटी प्रोडक्टची शॉपिंग करायच्या. मात्र ‘नायका’ने थेट घरापर्यंत हे प्रोडक्ट आणून देण्यास सुरुवात केली.

सेलिब्रिटी आणि इतर माध्यमातून केलेल्या जाहिरातींचा फायदा ‘नायका’ला झाला. अगदी लिपस्टीक्सपासून ब्रायडल मेकअप, नेलपॉलिश, फाऊण्डेशन अशा मेकअप संदर्भातील सर्वच वस्तू ‘नायका’वर उपलब्ध आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीची उलाढाल ३५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. सध्याच्या ऑनलाइन जमान्यामध्ये या कंपनीला आणि या प्लॅटफॉर्मला चांगली मागणी असल्याने शेअर्सलाही चांगली किंमत मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीची मालकी दोन कुटुंबाच्या नावे असणारे ट्रस्ट आणि सात इतर प्रमोटर्सकडे आहे. यामधील प्रमोटर्समध्ये फाल्गुनी यांचा मुलगा आणि मुलीचाही समावेश आहे.