देशातील निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्री शक्तीचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढला आणि महिलांच्या कर्तबगारीचा नीट वापर करता आला तर भारताची झपाटय़ाने भरभराट होईल, अशा शब्दात गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी फिक्कीच्या महिला संघटनेच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीला संबोधताना स्त्री शक्तीला कुर्निसात केला.
दिल्लीतील ल-मेरिडियन हॉटेलच्या सभागृहात मोदींनी दीड तासांच्या भाषणात स्त्रीशक्तीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. देशाच्या निम्म्या लोकसंख्येला निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आले पाहिजे. त्यांच्या सहभागाने विकासाला वेग प्रदान करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला प्रत्येक काम बारकाईने आणि पूर्ण निष्ठेने करतात. त्यामुळे विविध क्षेत्रांमधील त्यांच्या भागीदारीने वेगाने विकास होईल, असे ते म्हणाले.
मोदींच्या भाषणाचा सूर नेहमीप्रमाणे आक्रमक नव्हता. त्यांनी विकासाच्याच मुद्यांवर भर दिला. पण बहुतांश मुद्दे त्यांनी सौम्यपणे मांडले. गुजरातमधील लिज्जत पापड आणि अमूलचा ब्रँड मोठा करण्यात महिलांचा किती मोठा वाटा आहे, हे त्यांनी उत्साहाने आणि कौतुकाने सांगितले. गुजरातमधील जस्सू बेनचा पिझ्झा सर्वत्र लोकप्रिय आहे. अर्थात जस्सू बेन म्हणजे कलावतीसारखा प्रकार नाही. त्यांचे पाच वर्षांंपूर्वी निधन झाले. पण त्यांचा ब्रँड आजही लोकप्रिय आहे, असे नमूद करीत त्यांनी कलावतीच्या निमित्ताने राहुल गांधींना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. महिलांना ५० टक्के आरक्षण देणारे गुजरात विधानसभेने पारित केलेले विधेयक गुजरातच्याच महिला राज्यपाल कमला बेनीवाल यांनी कसे अडवून ठेवले आहे, याचाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना आवर्जून उल्लेख केला. गुजरातमध्ये आतापर्यंत आपण कठोर मेहनतीअंती काँग्रेसने तयार केलेले खड्डे बुजवून समतल मैदान तयार करण्यात यश मिळविले आहे. विकासाची भव्यदिव्य इमारत अजून उभारणे शिल्लक आहे, असेही ते म्हणाले. मोदींच्या वक्तव्यांना फिक्कीच्या महिला सदस्य आणि अन्य उपस्थित उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते.
आमच्या परंपरेत आईला सर्वोच्च स्थान आहे. पण आधुनिकतेमुळे आमचे विचार विकृत होत चालल्याने महिलांची अवस्था अठराव्या शतकापेक्षाही वाईट झाली आहे. अशाही स्थितीत मुलींना संधी मिळते तेव्हा त्या पुरुषांपेक्षा दोन पावले पुढे जातात.नरेंद्र मोदी