ओडिशातील संशोधनाची नासाकडून प्रशंसा
द्रुतगती मार्गावर अनेक वाहने वेगाने धावतात व त्यांचे टायर्स फुटून प्रवासी प्राणांना मुकतात. महामार्गावर आपोआप वाहनाचा वेग वाढत जातो. चालकावर नियंत्रण राहात नाही. टय़ूबलेस टायर हा एक प्रकार त्यात आहे. तरीही आता एक नवीन तंत्रज्ञान ओडिशाच्या टायचीजुनो प्रकल्पात शोधून काढले गेले आहे, त्यामुळे टायर तापत नाहीत व ते फुटण्याचे प्रमाण कमी होते. टायरफुटी प्रतिबंधक तंत्रज्ञान ओडिशात शोधले गेले आहे व त्याला न्यूयॉर्कमध्ये ६ नोव्हेंबरला नासाने गौरवले आहे. एकूण दहा नवप्रवर्तनशील प्रकल्प या स्पध्रेत होते. भविष्यकालीन तंत्र आलेखनाच्या बाबत ही स्पर्धा होती. टायरफुटी चाकांचा समतोल व इंधन कार्यक्षमता यातही या तंत्राने बदल केले आहेत. साठ देशांच्या तरुण वैज्ञानिकांनी यात भाग घेतला होता. त्यातील आठ चमूंना पुरस्कार मिळाला, तर ३२ शोधांचा समावेश नासाच्या प्रकाशनात केला आहे. नोव्हेंबरच्या अंकात हे शोध प्रसिद्ध केले आहेत. आताचे टायर बघता ते फुटू नयेत असे तंत्रज्ञान विकसित करण्यास चाळीस हजार तास लागले आहे. टय़ूबलेस, स्वआधारित किंवा बाह्ययंत्रणा असलेल्या टायर्ससाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. टायचीजुनो चमूचे प्रमुख व ओडिशाच्या संबळपूर जिल्ह्यातील व्हीएसएस तंत्रज्ञान विद्यापीठाचे विद्यावाचस्पती समीर पांडा यांनी हे तंत्रज्ञान तयार केले आहे. उदित बोंडिया, के. एन. पांडिया व स्मितपर्णा सत्पथी यांचाही संशोधनात मोठा वाटा आहे. पांडा यांनी सांगितले, की टायचीजुनोच्या तंत्रज्ञानाचा वापर दर १ कोटी वाहनात केला तर टायरमधील दोषामुळे वाढणारे कार्बन उत्सर्जन वर्षांला १० हजार टनांनी कमी होईल व इंधन कार्यक्षमता वाढून २० कोटी गॅलन पेट्रोल कमी लागेल. त्याचाच दुसरा अर्थ १६.३४ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल व ५०० टन कर्करोगकारके कमी सोडली जातील. पांडा हे तंत्रज्ञानाच्या वापरासाठी व्यावसायिक भागीदार शोधत आहेत.