scorecardresearch

‘मोदींना इशरत जहाँ प्रकरणात गोवण्यासाठी माझ्यावर दबाव होता’

गुजरातमधील काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता या सगळ्या वादग्रस्त हालचालींच्या केंद्रस्थानी होता

Ishrat Jahan encounter case, Rajendra Kumar, IB, david headley, Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
त्यावेळी नरेंद्र मोदींची वाढती ताकद केंद्रातील युपीए सरकारसमोरील मोठे आव्हान होते, असे राजेंद्र कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

नरेंद्र मोदी यांना इशरत जहाँ प्रकरणात गोवण्यासाठी मला अनेक आमिष दाखविण्यात आली होती, असा गौप्यस्फोट इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) माजी संचालक राजेंद्र कुमार यांनी शनिवारी केला. याप्रकरणात मी चुकीचे पुरावे सादर करावेत, यासाठी मला अनेक प्रलोभने दाखविण्यात आली होती. निवृत्तीनंतर तुम्हाला एखादे मोठे पद देऊ, असा प्रस्ताव काहीजणांकडून माझ्यासमोर ठेवण्यात आला होता. मात्र, मी खोटे पुरावे सादर करण्यास नकार दिला. याप्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव गोवण्यासाठी मी खोटी साक्ष द्यावी, असे काहीजणांना वाटत होते. ही साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य ठरू शकली असती. त्यावेळी नरेंद्र मोदींची वाढती ताकद केंद्रातील युपीए सरकारसमोरील मोठे आव्हान होते, असे राजेंद्र कुमार यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.
यावेळी राजेंद्र कुमार यांनी आयबीचा इशरत जहाँ एन्काउंटर आणि गुजरात पोलिसांच्या त्यावेळच्या कारवाईशी कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. पोलिसांकडून हा एन्काउंटर करण्यात आला होता. आमचे काम फक्त माहिती देण्यापुरते मर्यादित होते. त्यानंतर गुजरात पोलिसांनी केलेल्या कारवाईशी आमचा काहीही संबंध नव्हता, असे राजेंद्र कुमार यांनी म्हटले. यासंदर्भात ६ ऑगस्ट २००९ रोजी गृहखात्याकडून प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रात आयबीने एन्काउंटरसंदर्भात पुरविलेली माहिती खरी असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याविषयी काही लोक असंतुष्ट होते. त्यांनी काही साक्षीदारांवर दबाव आणून हे प्रतिज्ञापत्र खोटे ठरविण्याचा प्रयत्न केल्याचेही राजेंद्र कुमार यांनी म्हटले. गुजरातमधील काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता या सगळ्या वादग्रस्त हालचालींच्या केंद्रस्थानी  होता. या नेत्याकडून गृहखात्याच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती खोटी ठरविण्यासाठी लोकांना सूचना देण्यात आल्या होत्या. गुजरात पोलीस खात्यातील काही असंतुष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून या नेत्याकडून अशाप्रकारचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती राजेंद्र कुमार यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2016 at 18:00 IST

संबंधित बातम्या