भारतातील सर्वात वयोवृध्द आणि प्रसिध्द सिंह ‘राम’ याचे वृध्दापकाळाने शनिवारी निधन झाले. तो पंधरा वर्षांचा होता अशी माहिती गिर अभयारण्याच्या अधिका-यांनी दिली आहे.

‘राम’ हा अतिशय देखणा आणि शोभिवंत होता. तसंच गिर अभयारण्यातील सर्वाधिक छायाचित्रे काढल्या गेलेल्या सिंहांमध्ये ‘राम’ आघाडीवर होता. गिर अभयारण्यात तब्बल ५०० सिंह असून आशियाई सिंहांसाठी पूरक असे हे जगातील एकमेव अभयारण्य आहे. राम आणि त्याचा भाऊ श्याम यांनी गेल्या काही वर्षात येथे येणा-या पर्यटकांवर मोहिनी टाकली होती.

‘राम’च्या मृत्यूनंतर त्याचे शव विच्छेदन करण्यात आले असून त्याचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने झाल्याचे अहवालात म्हटले आहे, अशी माहिती उप वनसंरक्षण अधिकारी राम रतन नाला यांनी दिली.