पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्यानंतर देशभरामध्ये राम भक्तांनी काही ठिकाणी मिठाई वाटून, तर काही ठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असले तरी या भूमिपूजन सोहळ्याचा आनंद राम भक्तांबरोबरच भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही साजरा केला आहे. एकीकडे देशामध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद साजरा केला जात असतानाच जम्मू काश्मीरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला वर्षपुर्ती झाल्यानिमित्त मिठाई वाटप केलं. मात्र देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एकत्र येऊन कलम ३७० रद्द करण्यासंदर्भातील आनंदोत्सव साजरा करण्यावर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आक्षेप नोंदवला आहे. अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बासित झारगर या काश्मीरमधील छायाचित्रकाराने श्रीनगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिठाई वाटप करुन आनंद साजरा केल्याचे फोटो ट्विट केले. या फोटोंमध्ये भाजपाचे कार्यकर्ते एकत्र येऊन मिठाई वाटप करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये अनेक कार्यकर्ते दिसत असून त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

बसितने ट्विट केलेले हेच फोटो रिट्विट करत अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपा त्यांचा ढोंगीपणा दाखवत आहे. ते लोकं (भाजपा कार्यकर्ते) एकत्र येऊन आनंद साजरा करु शकतात. मात्र इतर सर्वजण एकत्र येऊन जम्मू काश्मीरमध्ये काय सुरु आहे याबद्दल चर्चाही करु शकत नाही,” असं ट्विट अब्दुल्ला यांनी या फोटोवर प्रितिक्रिया देताना केलं आहे.

 

मागील वर्षी  ५ऑगस्ट रोजी देशाच्या संसदेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील अनेक नेत्यांना नजरकैद करण्यात आलं होतं ज्यामध्ये अब्दुल्ला यांचाही समावेश होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांची नजरकैदेतून सुटका झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar abdullah says bjp displaying its hypocrisy over bjp supporters anniversary celebration of abrogation of article 370 scsg
First published on: 05-08-2020 at 13:40 IST