करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत असली तरी या प्रतिकारशक्तीला चकवा देण्याची लक्षणीय क्षमता ओमायक्रॉनमध्ये असल्याचे दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी सांगितले. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे पुन:संक्रमणाचा धोका अधिक असल्याची भीती या संशोधकांनी व्यक्त केली.

करोनाच्या बिटा आणि डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूंमुळे पुन:संक्रमण होत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मात्र करोनाबाधिताच्या शारीरिक प्रतिकारशक्ती टाळूनही ओमायक्रॉन होऊ शकतो. त्यामुळे एकदा विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाला काही दिवसांनी पुन्हा या विषाणूची लागण होण्याचा धोका आहे, असे या संशोधकांनी लोकसंख्येवर आधारित पुराव्यांद्वारे सांगितले.

नव्या उत्परिवर्तित विषाणूमध्ये ५० उत्परिवर्तन (म्युटेशन्स) असून त्यातील ३२ स्पाइक प्रोटीन असल्याने हा विषाणू मानवी पेशीच्या आतमध्ये प्रवेश करतात, असे या संशोधकांनी सांगितले. ओमायक्रॉनची लागण झालेल्या काही रुग्णांचा या संशोधकांनी अभ्यास केला. २७ नोव्हेंबर रोजी करोना चाचणी सकारात्मक आलेल्या या रुग्णांना ९० दिवसांपूर्वीही करोना झाल्याचे दिसून आले.

‘डेल्टापेक्षा कमी धोकादायक’

वॉशिंग्टन : ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी करोनाच्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूपेक्षा ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याचे संकेत संशोधकांनी दिल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथोनी फौसी यांनी दिली. ते म्हणाले की,  ही दिलासादायक बातमी आहे. मात्र ओमायक्रॉनच्या तीव्रतेविषयी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संशोधकांकडून अधिक माहिती मिळवण्याची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असली तरी अनेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात गरज लागलेली नाही. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर अमेरिकेने काही आफ्रिकी राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांच्या नागरिकांना प्रवेश करण्यास निर्बंध आणले होते. मात्र या बातमीनंतर बायडेन प्रशासन हे निर्बंध हटवण्याचा विचार करत असल्याचे फौसी यांनी सांगितले.