हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी कट्टरपंथी शीख संघटनांसाठी ‘नायक’ ठरला आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या या दहशतवाद्याला एका नियतकालिकेच्या कव्हरपेजवर स्थान देण्यात आले आहे. त्याला ‘काश्मीरच्या स्वातंत्र्याचा नायक’ म्हणून संबोधले आहे. फतेहगढ साहिब येथे ‘शहीदी जोर मेला’ येथे हे नियतकालिक खुलेआम विकले जात आहे. रऊजा शरीफजवळ लावण्यात आलेल्या या स्टॉलची निगराणी शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) समर्थक करत आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या या जत्रेत सुमारे दहा लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत ही जत्रा असेल. गुरू गोविंद सिंग (शिखांचे दहावे गुरू) यांची मुले साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि साहिबजादा बाबा फतेह सिंग यांच्या स्मृतीदिनानिमित्त या जत्रेचे आयोजन केले जाते.
खलिस्तान समर्थक वंगार (आव्हान) या नियतकालिकेच्या ऑगस्ट २०१६ च्या अंकातील कव्हर पेजवर बुरहान वानीला स्थान देण्यात आले होते. वानीचा खात्मा झाल्यानंतर एक महिन्यानंतर वंगारचा अंक समोर आला होता. १८ महिन्यानंतर तो अंक आता विक्रीला ठेवण्यात आला आहे. या जत्रेत याची ३० रूपये किंमत ठेवण्यात आली आहे. वानीला जुलै २०१६ मध्ये कंठस्नान घालण्यात आले होते. सुमारे ४२ पानांच्या या नियतकालिकेत बुरहान वानीवर दोन लेख लिहिण्यात आले आहेत. यातील एक लेख दल खालसाच्या गजिंदर सिंगने लिहिला आहे. गजिंदर सिंग सध्या पाकिस्तानात असल्याचे बोलले जाते. तर दुसरा लेख हा खलिस्तान समर्थक बलजित सिंग खालसाने लिहिला आहे. तर स्वातंत्र्यावर विशेष संदेशवरील लेख पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या हत्येतील दोषी जगतारसिंग हावराने लिहिला आहे. तो सध्या तिहार तुरूंगात कैदेत आहे. त्याबरोबर जर्नेलसिंग भिंद्रानवालेसमवेत अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांशी निगडीत बॅज आणि स्टीकरही विकण्यात येत आहे. पुस्तकांची विक्री करणाऱ्या व्यक्तीने आपण फक्त पुस्तकं आणि नियतकालिके विकत असून यात चुकीचं काय आहे, असा सवाल केला. आम्ही कोणाचे नुकसान केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनीही आम्हाला काही म्हटलेलं नाही, असेही तो दुकानदार म्हणाला.
दरम्यान, जत्रेत दहशतवादी आणि कट्टरपंथीयांवरील पुस्तके खुलेआम विकली जात आहेत. पण पोलिसांनी याबाबत काहीच माहिती नाही. पोलीस उपायुक्त कंवलप्रीत कौर बरार आणि पोलीस अधीक्षक अलका मीना यांनी या जत्रेत असं काही विकले जात असल्याची माहिती नसल्याचे म्हटले. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा वस्तू जत्रेत विकता येत नाही. याप्रकरणी चौकशी करू असे त्यांनी म्हटले.