नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ या चित्रपटात अभिनेता संजय दत्तच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण अधोरेखित करण्यात आले. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा कलाविश्वात संजूबाबाची चर्चा होऊ लागली आहे. संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी पुन्हा नव्याने वर येऊ लागल्या आहेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाने संजय दत्तचं पूर्ण आयुष्यच बदललं होतं. याच प्रकरणात संजयला जामिन मिळावा यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच सुनील दत्त यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागितली होती.

बाबरी मशिद पाडली गेल्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीवेळी संजय दत्तकडे शस्त्रे सापडली होती. त्यामुळे त्याला अटकही करण्यात आली. संजय दत्तला झालेल्या अटकेच्या घटनेमुळे पक्षातूनच सुनील दत्त यांना विरोध सहन करावा लागला होता. संजयची सुटका व्हावी यासाठी त्यांनी शरद पवारांसह इतरही मोठ्या नेत्यांची भेट घेतली होती. पण या भेटींचा काहीच फायदा न झाल्याने अखेर त्यांनी बाळासाहेबांकडून मदत मागितली होती. तेव्हा १९९५मध्ये सुनील दत्त यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यात शिवसेना- भाजप युतीची सत्ता होती.
या प्रकरणात संजय दत्त विनाकारण अडकला जात असल्याचं बाळासाहेबांचं मत होतं. टाडा कोर्टाकडून त्याला जामिन मिळावा यासाठी १९९५ साली त्यांनी फार प्रयत्नही केले. १८ महिन्यांनंतर संजय दत्तची जेलमधून सुटका झाली होती. तेव्हा संजय दत्तने तुरुंगातून सुटल्यानंतर बाळासाहेबांची भेटही घेतली होती.

नोव्हेंबर २०१२ मध्ये जेव्हा बाळासाहेबांची तब्येत खालावली होती, तेव्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्तने म्हटलं होतं की, ‘बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. जेव्हा कोणीच मला साथ द्यायला तयार नव्हते तेव्हा ते माझ्या बाजूने उभे होते.’ त्यानंतर एका आरोपीच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, अशी टीका बाळासाहेबांवर नेहमीच होत राहिली.