scorecardresearch

घरी परतण्याच्या लांबलचक मार्गात स्थलांतरित मजुरांना मिळाला मध्य प्रदेशात हक्काचा दिलासा!

लॉकडाउनच्या काळात मजुरांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक हाल झाले ते स्थलांतरित मजुरांचे. महाराष्ट्रातून हजारो मजुरांनी घरी जाण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय निवडला. तसेच इतर राज्यांमधले मजूरही आपआपल्या राज्यात परतू लागले. या मजुरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मात्र मध्य प्रदेशातल्या विदिशा या ठिकाणी या मजुरांना एक हक्काचा दिलासा मिळाला. या ठिकाणी आल्यानंतर एकही मजूर पुढे उपाशी गेला नाही. कदाचित हा चेक पॉईंट सम्राट अशोकाच्या सांची स्तुपाच्या खाली तयार झाला आहे म्हणूनही असेल बहुदा!

दररोज या ठिकाणाहून १० ते १५ हजार स्थलांतरित मजूर पुढे जात होते. यातले बहुतांश लोक हे महाराष्ट्रातले होते. आम्ही यातल्या कुणालाही पायी जाऊ दिलं नाही, तसंच साधं सायकलवरही जाऊ दिलं नाही. आम्ही या लोकांना रिकाम्या ट्रक किंवा बसमध्ये बसवून पुढे सोडलं अशी माहिती विदीशाचे पोलीस उप निरीक्षक इश्वर बघेल यांनी दिली.

२८ मार्चपासून बघेल हे या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती की जो कुणीही स्थलांतरित मजूर पायी जाताना दिसेल त्याला तसं न जाऊ देता त्याच्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी. या ठिकाणी जे कुणीही पायी आले त्यांच्यासाठी आम्ही वाहतुकीची व्यवस्था केली.

मध्य प्रदेशातील इतर चेक पॉईंट्सवर स्थलांतरित मजुरांना मदत करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून आम्ही इथून जाणाऱ्या प्रत्येक मजुराला अन्न पुरवतो आहोत. खिचडी, डाळ भात, पुरी भाजी अशा प्रकारे आम्ही मजुरांना अन्न पुरवत आहोत. दररोज आम्ही सुमारे ५ हजार गरीबांना अन्न पुरवत आहोत अशी माहिती विदिशाचे कर्मचारी दिनेश सक्सेना यांनी दिली. एवढंच नाही तर आम्ही इथे मजुरांना चहा-बिस्किटही देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विदिशा महानगर पालिकेचे १५ कर्मचारी या ठिकाणी आहेत. जे दोन शिफ्ट्स मध्ये काम करत आहेत. आम्ही इथे चार तंबू उभारले आहेत. ज्यामध्ये अन्न, औषधं आणि प्रथमोचारांची व्यवस्थाही केली आहे. स्थानिक पोलीस, महापालिकेची समिती यांचंही सहकार्य आम्हाला लाभलं आहे असंही सक्सेना यांनी स्पष्ट केलं.

सध्याच्या घडीला अजूनही दररोज शेकडो मजूर हे मध्यप्रदेशातून त्यांच्या घरी जात आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. त्यातल्या काही मजुरांना आलेले अनुभवही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी तर आम्हाला साधं प्यायचं पाणीही मिळालं नाही. लोक फुटलेल्या पाईपलान्स मधून पाणी पिऊन त्यांची तहान भागवत होते. महाराष्ट्रातून जेव्हा मध्यप्रदेशात पोहचलो तेव्हा आम्हाला अन्न आणि पाणी मिळालं.. अशी माहिती प्रमोद कुमार गुप्ता यांनी दिली. ते त्यांच्या मित्रासोबत ठाण्याहून अलहाबादला जात होते. त्यांच्या दुचाकीवरुन ते निघाले असतानाचा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला.

मी गेल्या ३६ तासांपासून प्रवास करतो आहे. मी दादरा नगर हवेलीहून निघालो त्यानंतर गुजरातला पोहचलो तेव्हा मला थोडंफार खायला मिळालं. महाराष्ट्रात या स्थलांतरित मजुरांची काही सोय नाही. जेव्हा मध्यप्रदेशच्या सीमेवर पोहचलो तेव्हा आम्हाला सेंधवा या ठिकाणी अन्न मिळालं. तिथे फूड स्टॉल्स होते. प्रिन्स कुमार गुप्ता यांनी हा अनुभव सांगितला. ते देखील त्यांच्या दुचाकीवरुन प्रवास कर होते. त्यांना मध्य प्रदेशातल्या रेवा मध्ये पोहचायचं होतं.

बिंदेश्वर वर्मा हे रिक्षा चालक आहेत. ते मुंबईतल्या सांताक्रूझमध्ये गेल्या १५ वर्षांपासून रिक्षा चालवतात. मी मुंबईहून पाणी घेऊन निघालो होतो. मधल्या रस्त्यात मी घेऊन निघालेलं पाणी गरम झालं. मात्र महाराष्ट्रात मला साधं पाणी भरण्यासही मिळालं नाही. मी जेव्हा मध्यप्रदेशात पोहचलो तेव्हा मला अन्न आणि पाणी मिळालं.. असं वर्मा यांनी स्पष्ट केलं.

 

 

एक टेम्पो ड्रायव्हर भिवंडीहून निघाला होता. १६०० किलोमीटर प्रवास केल्यानंतर मला मध्यप्रदेशात गेल्यावर अन्न आणि पाणी मिळालं.  त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही असं या ड्रायव्हरने म्हटलं आहे. त्यांनी ज्या प्रकारे स्वागत केलं ते कधीच विसरत नाही असंही या ड्रायव्हरने म्हटलं आहे.

 

 

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On the long journey back home some welcome relief for migrants in mp scj

ताज्या बातम्या