नवी दिल्ली : गूगलच्या विविध भाषा अनुवादित करण्याच्या सुविधेमध्ये (गूगल ट्रान्सलेट) आता संस्कृतचे प्रमाणित भाषांतर होऊ शकेल. ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’च्या (आयसीसीआर) पुढाकाराने प्रायोगिक तत्त्वावर संस्कृत भाषांतराचा प्रयोग सुरू असून आतापर्यंत ‘गूगल ट्रान्सलेट’साठी संस्कृतची एक लाख वाक्यसमूह तयार केली आहेत. त्यामध्ये दैनंदिन वापरातील शब्द व वाक्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संस्कृतचा अन्य भाषांमध्ये व अन्य भाषांचा संस्कृतमध्ये उत्तम अनुवाद केला जाऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्कृत भाषांतरासाठी ‘गूगल ट्रान्सलेट’ सुविधेचा सर्वाधिक वापर केला असला तरी, प्रमाणित व रोजच्या वापरातील शब्दांचा वापर अधिक महत्त्वाचा आहे. संस्कृत भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी अनुवादाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे उपप्रमुख व पॅरिस येथील ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ संस्कृत स्टडीज’च्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. अमरजीव लोचन यांचा पाच सदस्यांचा चमू तीन महिने संस्कृत वाक्ये तयार करत होता. त्यांना दोन-तीन संस्कृतमधील तज्ज्ञ प्राध्यापक व ४८ विद्यार्थ्यांनी साह्य केले. प्रमाणित संस्कृत भाषांतरामुळे जागतिक स्तरावर संस्कृतमधील संशोधनाला वेग येईल. विविध भाषांमध्ये पूल बांधण्याचा प्रयत्न भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे. संस्कृतप्रमाणे अन्य भारतीय भाषांसाठी संस्थेच्या वतीने काम केले जाणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष व खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. या वेळी  ‘गूगल इंडिया’च्या संशोधन विभागाचे प्रमुख मनीष गुप्ता, परिषदेचे महासंचालक कुमार तुहीन, परिषदेचे उपमहासंचालक राजीव कुमार, प्रा. अमरजीव लोचन आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lakh phrases standardized translation sanskrit iccr initiative google translate facility ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST