कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी आता एक पानी सुटसुटीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सरकारने आज जाहीर केले. आतापर्यंत वेगवेगळ्या सेवांसाठी जास्त पानांचे अर्ज होते ते आता एक पानाचे करण्यात येत आहेत
केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू दाखल्यासह वेगवेगळ्या कामांसाठी मोठे अर्ज भरावे लागतात. आता आम्ही एकच पानांचा अर्ज उपलब्ध करून देत आहोत. यातील निवृत्तिवेतनधारकांसाठीच्या एक पानी अर्जाचे प्रकाशन जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने हा अर्ज जारी करण्यात आला.
आता आम्ही निवृत्तिवेतनधारकांसाठी एक पानाचा अर्ज दिला आहे. यापुढे सर्व सेवांसाठी एक पानांचे अर्ज तयार केले जातील त्यामुळे भरपूर पानांचे अर्ज यापुढे भरावे लागणार नाहीत. अर्ज साधे, लहान व सोपे करून लाभार्थीना कमी त्रास होईल असा विचार यात आहे, अनेकदा तीच ती माहिती परत परत विचारलेली असते तो दोष यात दूर केला जाईल असे ते म्हणाले. दर महिन्याला आम्ही दोन केंद्र सरकारी खात्यांबरोबर बैठका घेऊन अर्ज सुलभ करीत आहोत, वर्षभरात सर्व सेवांचे अर्ज एक पानी केले जातील. कार्मिक सचिव संजय कोठारी यांनी सांगितले की, सरकार आधार कार्ड क्रमांक या सरकारी सेवात समाविष्ट करीत असून त्यामुळे त्यांना इतर माहिती भरावी लागणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आधार कार्डे काढणे गरजेचे आहे तरच ते आधारकार्ड क्रमांक या अर्जात लिहू शकतील, या क्रमांकामुळे त्यांना बरीच माहिती भरावी लागणार नाही त्यात पत्ता व इतर गोष्टींचा समावेश आहे. करदात्यांचा पैसा योजनेतील योग्य व्यक्तींना मिळेल यासाठीही आधारकार्डाची गरज आहे.