Rahul Gandhi on Fake Voter: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचे म्हटले आहे. दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे सादरीकरण केले. यासाठी त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली आहेत. ११,९६५ बोगस मतदारांची नावे एकाच राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात विविध मतदान केंद्रावर दाखविल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच याच मतदारांनी विविध राज्यात मतदान केल्याचाही दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी आपल्या सादरीकरणात गुरकिरत सिंग या बोगस मतदाराची माहिती दिली. एकाच मतदारसंघात वेगवेगळ्या मतदार याद्यात या मतदाराच्या नावाचा समावेश होता. ही यादीही राहुल गांधी यांनी दाखवली. तसेच याच मतदाराने चार विविध राज्यातही मतदान केल्याचे तिथल्या मतदार यादीतून दिसून येत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ११,९६५ बोगस मतदारांनी अनेकवेळा विविध राज्यातून मतदान केले आहे. या मतदारांची यादीही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. तसेच पुढे जाऊन त्यांनी खोटे पत्ते असल्याची मतदार यादी दाखवली. ज्यामध्ये अनेक मतदारांचा घराचा क्रमांक ० असल्याचे दाखवले. तसेच अनेक मतदारांच्या वडिलांचे नाव इंग्रजी आद्यक्षरावरून काहीही ठेवल्याचेही त्यांनी दाखवले.

fake voter
एका व्यक्तीचे एकाच मतदारसंघात विविध मतदान केंद्रावर नाव असल्याचे राहुल गांधी यांनी दाखवले.

राहुल गांधी सादरीकरण असताना वडिलांच्या नावावरून पत्रकारांमध्ये हशा पिकला. यावर राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला नक्कीच हे हास्यास्पद वाटत असेल. पण या अशा पद्धतीमुळे संपूर्ण यंत्रणाच उध्वस्त झाली आहे.

ओपिनियन पोल, एक्झिट पोलमध्ये वेगळेच चित्रे

राहुल गांधी म्हणाले की, विविध राज्यांच्या निवडणुकीच्या आधी वातावरण वेगळे असायचे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल वेगवेगळे होते. हरियाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये हे चित्र दिसले. निकालानंतर असे चित्र बनवले जायचे की, या या कारणामुळे भाजपाचा विजय झाला. जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जात होती. तेव्हा भारतात एका दिवसात निवडणूक व्हायची. पण आता ईव्हीएमने मतदान होऊनही अनेक टप्पे घेतले जातात. या सर्व कारणांमुळे आम्हाला निवडणूक प्रक्रियेवर पहिल्यांदा संशय बळावला. महाराष्ट्रात लोकसभेला आमच्या आघाडीला चांगले यश मिळाले. पण विधानसभेत सुपडा साफ झाला. कारण पाच महिन्यात महाराष्ट्रात एक कोटी मतदार वाढले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

first time voter in many constituency
प्रथम मतदार म्हणून वृद्धांचं मतदान

७० वर्षीय वृद्धेचा प्रथम मतदार म्हणून उल्लेख

पत्रकार परिषदेत बोगस मतदारांची माहितीबरोबरच फॉर्म ६ चा दुरूपयोग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. यासाठी त्यांनी एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे उदाहरण दिले. या महिलेच्या नावाने दोन वेळा फॉर्म ६ भरण्यात आला होता. तसेच त्यांच्या नावाने दोन वेळा मतदान झाल्याचेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले. ३३,६९२ मतदारांची एका मतदारसंघात अशाप्रकारे नोंदणी झाल्याचे गांधी यांनी दाखवले. या सर्व उमेदवारांचे वय ७० ते ९५ वर्षांच्या घरात असल्याचेही ते म्हणाले.

पाच मार्गांनी होते ‘मत चोरी’

राहुल गांधी यांनी मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहार पाच मुद्द्याद्वारे स्पष्ट केला.

How vote chori happens rahul gandhi
पाच प्रकारे मतदान चोरी होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

१) बोगस मतदार
२) खोटे पत्ते आणि तपशील
३) एकाच पत्त्यावर अनेक मतदार राहत असल्याचे दाखवणे
४) चुकीचे फोटो, असे फोटो वापरण्यात आले जे मतदार यादीत स्पष्ट दिसणार नाहीत. असे फोटो जे नीट ओळखताच येणार नाहीत
५) फॉर्म ६ चा दुरुपयोग करुन मतदार याद्यांमध्ये वृद्धांना प्रथम व्होटर दाखविण्यात आले