One-year-old son of Armyman dies after shuffling between 5 hospitals in 4 districts : उत्तराखंड येथे एक वर्षीय बाळाला चार जिल्ह्यांमधील पाच रुग्णालयात फिरवण्यात आल्यानंतर त्याचा एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मृत्यूनंतर संताप व्यक्त केला जात असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
शुभांशू जोशी असे नाव असलेला हा चिमुरडा चमोलीच्या ग्वालदम येथील एका लष्करी अधिकाऱ्याच्या मुलगा होता. शुभांशू याला गंभीर डिहायड्रेशनची लक्षणे दिसू लागल्याने सुरुवातीला त्याला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे सेवा चांगली नसल्याने कुटुंबाला त्या बाळाला घेऊन बागेश्वर, अल्मोरा आणि अखेर नैनितालच्या हल्दवानी अशा इतर चार ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये जावे लागले, पण येथे सहा दिवासांनंतर त्या मुलाचा मृत्यू झाला.
“वैद्यकीय उपचारांमध्ये दुर्लक्ष केल्याने एका निष्पाप मुलाचा बागेश्वर येथे मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे,” अशी पोस्ट राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर केली आहे. “आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी असे दिसून येते की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही पातळीवर निष्काळजीपणा केला आहे. कुमाऊं आयुक्तांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा उदासीनता दाखवल्याचे आढळून आल्यास, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. लोकांचे जीव आणि विश्वासाचे रक्षण करताना कोणालाही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नेमकं काय झालं?
चामोलीच्या ग्वालदाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी नारायन देवरारी यांनी सांगितलं की जोशी याला पीएचसी येथे १० जुलै रोजी दुपारी १.५० वाजता आणण्यात आले, त्याला स्तनपान देता येत नव्हते आणि त्याला सतत उलट्या होत होत्या. त्यानंतर त्याला २२ किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर बैजनाथ येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात रेफर करण्यात आले. “मुलाला पाहण्यासाठी आमच्याकडे बालरोगतज्ज्ञ नव्हते. सीएचसीमध्ये अल्ट्रासाऊंडची सुविधा होती आणि तेथे प्रथमोपचार सेवा देण्यात आल्या होत्या,” अशी माहिती त्यांनी दिली.
बैजनाथ येथील सीएचसीमझ्ये मुलावर उपचार करण्यात आले पण त्याची तब्येत ढासळली, त्यानंतर सेंटरकडून त्याला बागेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले, जे आणखी २० किमी दूर होते. जिल्हा रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार आदित्य तिवारी यांनी सांगितले की, मुलाला मेंदूंत ब्लड फ्लो इम्पेडन्सचा त्रास होता आणि पीडियाट्रिक आयसीयू युनिट नसल्याने त्यांनी त्याला पुढील सेंटरकडे रेफर केले.
“आमच्याकडे न्यूरोलॉजिस्ट किंवा कार्डिओलॉजिस्ट नाहीत. मुलावर पुढील उपचार करण्यासाठी रुग्णालयात पीआयसीयू नव्हता. जर चांगला आरोग्य सुविधा असत्या तर तो वाचू शकला असता,” असेही त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे आणि एक अहवाल सादर करण्यात आला आहे.
दरम्यान मुलाला नंतर ६८ किमी दूर असलेल्या अल्मोरा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले, पण तेथूनही त्याला हल्दवानी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. ३३० बेड्सच्या अल्मोरा रुग्णालयात दोन आयसीयू आहेत, ज्यापैकी एक पीडियाट्रिक केअरसाठी आहे. त्यानंतर मुलाला हल्दवानी येथील सुशिला तिवारी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा १६ जुलै रोजी मृत्यू झाला.
शुभांशूचे वडील दिनेश जोशी हे जम्मू आणि काश्मीर येथे तैनात आहेत, त्यांनी आरोप केला की त्यांच्या पत्नीने जिल्हा रुग्णालयातून अल्मोरा येथे जाण्यासाठी रात्री ७ वाजता रुग्णवाहिकेला फोन केला. पण पुढील एक तासातही ती उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर त्यांना जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना फोन करून मदत मागावी लागली. डीएमनी आदेश दिल्यानंतर अखेर रुग्णवाहिका रात्री साडेनऊ वाजता उपलब्ध झाली असे त्यांनी सांगितले.
“जेव्हा मी त्याला घेऊन बागेश्वर येथे गेले तेव्हा तो गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी आम्हाला १०८ वर रुग्णवाहिकेला कॉल करण्यास सांगितले. मी रात्री ७ च्या सुमारास फोन केला आणि त्यांनी ते ३० मिनीटांत येतील असे सांगितलं. जेव्हा ते आले नाहीत, तेव्हा मी डॉक्टरांकडे गेले आणि सांगितले की मी असहाय्य आहे आणि माझे पती दूर ठिकणी कामावर आहेत. ते माझ्या दुःखाबद्दल उदासीन होते आणि त्यांनी मुलाला हायर सेंटरमध्ये घेऊन जाण्याचा आग्रह धरला,” असे शुभांशूच्या आईने सांगितले.