घुसखोरी, बंडखोरी आणि पुराच्या धोक्यापासून केवळ भाजपच आसामला वाचवू शकतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे सांगितले.
आपण अलीकडेच श्रीमंत संकरदेव यांच्या बोरदुवा या जन्मस्थानाला भेट दिली. तेथील जमिनीवर काँग्रेसच्या राजवटीत घुसखोरांकडून अतिक्रमण झाले होते. आपले हेलिकॉप्टर कोठे उतरविण्यात येणार आहे, अशी विचारणा केली, तेव्हा अतिक्रमण केलेले एकेकाळी वास्तव्य करीत होते तेथे ते उतरविण्यात येणार असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. मात्र आता तेथे अतिक्रमण झालेले नसल्याचे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या राजवटीत हे घडल्याचे आपल्याला सांगण्यात आले, असे शहा म्हणाले.
काँग्रेसच्या राजवटीत आसाममध्ये हिंसाचार आणि अस्थैर्य होते, मात्र गेल्या पाच वर्षात भाजपच्या राजवटीत राज्यात शांतता प्रस्थापित होऊन विकास झाला, असे शहा यांनी सोमवारी येथे सांगितले. आसाममधील निवडणूक सभेत अमित शहा पुढे म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर होता तेव्हा निदर्शने, हिंसाचार, बॉम्बस्फोट, मृत्यू आणि संचारबंदी हे सामान्य प्रकार होते, सर्वत्र घुसखोरी होत होती, असे अमित शहा म्हणाले. आसामच्या अस्मितेचे संरक्षण करण्याच्या गोष्टी काँग्रेस नेते राहुल गांधी करीत आहेत, मात्र एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्याशी आघाडी करून हे शक्य आहे का, असा सवाल शहा यांनी गांधी यांना केला.
जर अजमल सत्तेवर आलेच तर आसाम घुसखोरांपासून सुरक्षित राहील का, अधिकाधिक घुसखोर राज्यात यावेत असे जनतेला वाटत आहे का, असा सवालही गृहमंत्र्यांनी केला. आसाम आणि बंगालमधील जनतेमध्ये काँग्रेसने तिढा निर्माण केला, पठार प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश त्याचप्रमाणे उध्र्व आणि निम्न आसाम असा भेदभाव केला, तर भाजपने सर्व छोट्या समुदायांना विकासाने एकत्रित आणले, असेही शहा म्हणाले.
भाजपचा कारभार माफियासारखा – प्रियंका
सरूपठार (आसाम) : आसाममधील सत्तारूढ भाजपचा कारभार माफियांसारखा असून ते सिंडिकेट चालवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी सोमवारी येथे केला.
येथे एका जाहीर सभेत प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या की, राज्यातील भाजपमध्ये धृतराष्ट्र आणि शकुनी असे दोन गट असून या दोन्ही गटांनी आणि भाजपने राज्यातील जनतेशी प्रतारणा केली आहे, असेही त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता सांगितले.
धृतराष्ट्राला एकेकाळी जनतेचा नेता म्हणून संबोधले जात होते, याच धृतराष्ट्राने सहा वांशिक सममुदायांचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याचे आश्वाासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता केली नाही, असेही गांधी-वढेरा म्हणाल्या. तर अन्य नेता हा शकुनीमामा असून तो भ्रष्ट सरकार चालवून जनतेची फसवणूक करीत आहे, असेही त्या म्हणाल्या.