Operation Sindoor पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिल या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निरपराध भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद जगात उमटले. तसंच या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे ही बाबही समोर आली. दरम्यान पाकिस्तानला भारताकडून कसं उत्तर दिलं जाणार? काय कारवाई केली जाणार याच्या विविध चर्चा होत असतानाच ६ मेच्या रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?

“भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये २६ मायभगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करुन सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल्स उद्ध्वस्त करुन दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणं गरजेचं आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ऑपरेशन सिंदूरने ते दाखवून दिलं. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

india air stike operation sindoor
भारतीय लष्कराकडून मध्यरात्री दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातले १० जण हवाई हल्ल्यात ठार

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १० तर निकटवर्तीय असलेल्या ४ सदस्यांचा मृत्यू झाला. या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

विक्रम मिसारी यांनी काय सांगितलं?

पहलगामचा हल्ला हा अत्यंत क्रूर होता. तिथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं. खरंतर जम्मू काश्मीरची स्थिती चांगली होत होती. ती बिघडवण्यासाठी पहलगामचा हल्ला झाला. मागच्या वर्षी सव्वा दोन कोटींहून अधिक लोकांनी काश्मीरला भेट दिली होती. त्यानंतर पाकिस्तानने कुरापती काढण्यास सुरुवात केली. जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक दंगे उसळवण्यासाठीही दहशतवादी हल्ला केला. TRF ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही संघटना पाकिस्तानशी संबंधित आहे. प्रत्यक्षदर्शी आणि तपास यंत्रणांच्या मदतीने हल्लेखोरांची ओळखही पटली आहे. पहलगामचा जो हल्ला झाला तो दहशत पसरवण्यासाठीच झाला. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आता जगाला कळलं आहे. या हल्ल्याला उत्तर देणं आवश्यक होतं म्हणून आम्ही एअर स्ट्राईक केला असं विक्रम मिसारी यांनी स्पष्ट केलं.