पीटीआय, नवी दिल्ली

‘‘बिहारमधील मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) आणि मतदारयाद्यांच्या अनियमिततेशी संबंधित मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या आरोपांना योग्य उत्तरे देण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अयशस्वी ठरले आहेत. त्यांचे वर्तन भाजप प्रवक्त्यासारखेच आहे,’’ असा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी सोमवारी केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नवी दिल्लीत प्रमुख विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार हल्ला चढविण्यात आला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), द्रमुक, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. ‘‘मतदानाचा अधिकार हा संविधानाने सामान्य नागरिकाला दिलेला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे, लोकशाही त्यावरच अवलंबून आहे. निवडणूक आयोग ही त्याचे संरक्षण करण्यासाठी असलेली संस्था आहे. मात्र निवडणूक आयोग पक्षपाती काम करत आहे.

“राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश कुमार यांनी दिली नाहीत आणि ते त्यांच्या जबाबदारीपासून पळून जात आहेत,’’ असा आरोप काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी केला. विरोधकांनी विचारलेल्या वैध प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी कुमार यांनी राजकीय पक्षांवरच प्रश्न उपस्थित केले. निवडणुका फक्त तीन महिन्यांवर असताना राजकीय पक्षांशी चर्चा न करता, एसआयआर इतक्या घाईत का करण्यात आला, असा सवाल गोगोई यांनी विचारला.

निवडणूक आयोग काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तक्रारींसह प्रतिज्ञापत्र देण्यास सांगत आहेत. मात्र समाजवादी पक्षाने २०२२ मध्ये सुमारे १८ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याच्या तक्रारींसह प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही, असे समाजवादी पक्षाचे रामगोपाल वर्मा यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोइत्रा यांनी गेल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या मतदार यादीवर घेण्यात आल्या होत्या, ती योग्य नसेल, तर लोकसभा बरखास्त करावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अरविंद सावंत यांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांवर भाजप प्रवक्त्यासारखे वागण्याचा आरोप केला.

निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना रविवारी आम्ही शोधत होतो. मात्र आम्हाला भाजपचा एक नवीन प्रवक्ता सापडला.- मनोज झा, राष्ट्रीय जनता दल