केंद्र सरकारने संसदेची दोन्ही सभागृहं म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोहोंमध्ये दिल्ली सेवा विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. आता आज (८ ऑगस्ट) विरोधकांच्या वतीने आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु होईल. या चर्चेची सुरुवात खासदारकी परत मिळालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी करणार आहेत. दुपारी १२ ते संध्याकाळी ७ या कालावधीत ही चर्चा होईल. १० ऑगस्टला म्हणजेच येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देतील.

अविश्वास प्रस्तावाला २६ जुलैच्या दिवशी मंजुरी

२६ जुलैच्या दिवशी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेच्या सचिवालयात मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जावा म्हणून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना संबोधित करत अर्ज केला होता. या अर्जात हा उल्लेख करण्यात आला होता की विरोधी गट असलेल्या ‘इंडिया’मधले सगळेच पक्ष हे मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू इच्छितात. त्याला आपण मंजुरी द्यावी. तसंच सदन नियम १९८ अन्वये मणिपूरच्या मुद्द्यावर हा अविश्वास प्रस्ताव आणला गेला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारला. त्यानंतर आता आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु होईल ज्याची सुरुवात राहुल गांधी करणार आहेत.

हे पण वाचा- विरोधकांच्या ‘इंडिया’ला आत्ता तरी ‘भारत माते’चा पर्याय

कशी चालणार ही प्रक्रिया ?

मंगळवार आणि बुधवार म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्ट या दोन दिवशी दुपारी १२ ते संध्याकाळी ७ या कालावधीत चर्चा होईल. बुधवारी अमित शाह कदाचित या प्रस्तावावर उत्तर देतील. त्यानंतर १० ऑगस्टलाही दुपारी १२ पासून चर्चा सुरु होईल. दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविश्वास प्रस्तावावर उत्तर देतील. त्यानंतर या अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल.

समोर आलेल्या माहितीनुसार अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भाजपाकडून म्हणजेच सत्ताधारी चर्चाकडून निशिकांत दुबे हे सुरुवात करतील. तसंच स्मृती इराणी, निर्मला सीतारमण, ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यवर्धन राठोड यांच्यासह २० जण यावर बोलतील अशी शक्यता आहे.

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनाव खटल्यात दिलासा दिला आहे. गुजरात न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. आता आज संसदेत राहुल गांधी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.