जे. पी. नड्डा यांची टीका; वास्तव जनतेपर्यंत पोहोचवण्याची सूचना
नवी दिल्ली: विरोधी पक्ष रचनात्मक व विकासकामांत अडथळे आणत आहेत. विरोधकांची ही जनविरोधी भूमिका लोकांना समजली पाहिजे, ही बाब पक्षनेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, अशी सूचना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केली. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात झाली. विशेषत: पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पक्षाध्यक्ष नड्डा यांनी नुकतीच नवी कार्यकारिणी समिती जाहीर केली आहे, त्यानंतर झालेली ही पहिली बैठक आहे. आता राष्ट्रीय कार्यकारिणीचीही नोव्हेंबरमध्ये बैठक होणार आहे. सोमवारी झालेली बैठक ही त्याची पूर्वतयारी मानली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूमुळे व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे केंद्र सरकारवर टीका झाली होती. आता मात्र भाजपने करोनाच्या मुद्द्यावर आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या काळात विरोधी पक्ष झोपला होता. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. त्या काळात भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होता, असे नड्डा बैठकीत म्हणाले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करोना लसीकरण तसेच करोनासंदर्भातील आरोग्य सुविधांची माहितीही लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. १०० कोटी लसमात्रांचे लक्ष्य गाठले जाणार आहे. राज्यांना लसमात्रांचा पुरेसा पुरवठा केला जात आहे. करोनाच्या काळात गरिबांना मोफत धान्य पुरवण्यात आले आहे. लोकांना केंद्र सरकारकडून दिल्या गेलेल्या मदतीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची सूचनाही नड्डा यांनी केली. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज आहे. काळानुरूप बदलत्या संवेदनशील विषयांची माहिती घ्या. त्यानुसार पक्षाची बाजू लोकांसमोर मांडा, असेही नड्डा यांनी बैठकीत सांगितले.
उत्तर प्रदेशची चर्चा
केंद्राच्या योजनांचा प्रचार करण्यावर भर दिला जाणार असला तरी संघटनात्मक स्तरावर जातसमूहनिहाय मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीतीही आखली जात आहे. निव्वळ कल्याणकारी योजनांच्या आधारे उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकता येणार नसल्याने जातींच्या गणिताला प्राधान्य द्यावे लागत आहे. जातसमूहनिहाय मतदारांच्या संपर्क बैठका घेतल्या जात आहेत. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.