काँग्रेस सरकारने १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली रोखण्याचा प्रयत्न केला होता, या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिरोमणी अकाली दलाने टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने अनेक व्यक्तींना यात पाठीशी घातले व त्यांचा शिखांना ठार मारून रक्तपात घडवण्यात हात होता असा आरोप शिरोमणी अकाली दलाने केला आहे. दरम्यान, भाजपनेही गुजरातमधील दंगलीबाबत राहुल यांनी केलेल्या वक्तव्यावर आगपाखड केली.
२००२च्या गुजरात दंगलीत तेथील सरकारने त्वरित कठोर कारवाई केली होती, पण १९८४च्या दंगलीत सरकारने काहीच केले नव्हते, त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेले विधान हे अर्धवट माहितीवर आधारित आहे अशी टीका भाजप नेते अरुण जेटली यांनी केली.
नरेंद्र मोदी २००२च्या गुजरात दंगलीला जबाबदार आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. जेव्हा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगली झाल्या तेव्हा राहुल यांचे वडील राजीव हे पंतप्रधान होते, मग या दंगलींचा दोष काँग्रेस पक्षाला द्यायचा नाही काय, असा सवाल शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी केला.
गुजरातमध्ये २००२मध्ये जी दंगल झाली त्या वेळी अल्पसंख्याकांबरोबरच बहुसंख्याक समाजातील अनेक लोक मारले, पोलीस गोळीबारात मारले गेले. २००२च्या दंगलीमुळे माजी मंत्र्यांसह शेकडो लोक तुरुंगात गेले. १९८४मध्ये जी शीखविरोधी दंगल झाली, त्यात सामील असलेल्यांना संरक्षण दिले गेले व खासदारही करण्यात आले असा आरोप केला.
भाजपचे नेते अरुण जेटली यांनी सांगितले, की २००२च्या दंगलीत तेथील सरकारने त्वरित कारवाई केली होती, पण १९८४च्या शीखविरोधी दंगलीत सरकारने काहीच कारवाई केली नव्हती. भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी असा आरोप केला, की १९८४च्या दंगलीत आपल्या कल्पनेपेक्षा जास्त शीख लोक मारले गेले आहेत. भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले, की राहुल गांधी यांना कुठल्या अधिकारात उपाध्यक्षपद मिळाले त्याचे स्पष्टीकरण करावे, याउलट मोदी हे दारिद्रय़ातून वर आलेले आहेत व त्यांनी परिश्रम, एकनिष्ठता व उत्तम प्रशासनाच्या जोरावर पद मिळवले आहे असे प्रसाद यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
राहुल यांच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका
काँग्रेस सरकारने १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली रोखण्याचा प्रयत्न केला होता, या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिरोमणी अकाली दलाने टीका केली आहे.
First published on: 29-01-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition slams rahuls statement on modi