“विरोधकांनी विरोधात दीर्घकाळ राहण्याचा संकल्प घेतला आहे. तुम्ही कितीतरी दशक इथे बसला होता, तसाच विरोधात अनेक दशके बसण्याचा तुमचा संकल्प दिसतो. जनता जनार्दन ईश्वराचेच रुप असते. विरोधक अलीकडे जे प्रयत्न करत आहेत. त्यावर मला वाटतं जनता जनार्दन तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधकांमधील अनेक लोक निवडणूक लढण्याचा विश्वासही गमावून बसले आहेत. असेही ऐकण्यात येते की अनेक लोक यावेळीही मतदारसंघ बदलण्याच्या विचारात आहेत. काही लोक लोकसभेऐवजी राज्यसभेत जाणार आहेत. परिस्थितीचे आकलन करत ते आपापला रस्ता निवडत आहेत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपतींचे भाषण तथ्यांवर आधारित असते. या तथ्यांना नाकारण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. देश किती प्रगतीने विकास साधत आहे, पुढे जात आहे, याचा लेखाजेखा राष्ट्रपतींनी भाषणातून मांडला. राष्ट्रपतींनी भारताच्या चार बळकट स्तंभावर आपले लक्ष वळविले. हे चार स्तंभ जितके समृद्ध-विकसित होतील, तेवढा आपला देश वेगाने विकसित होईल. देशाची नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब आणि आमचे शेतकरी, कष्टकरी यांची चर्चा राष्ट्रपतींनी केली. या चार स्तंभाच्या माध्यमातून भारताचा विकास आपण साधू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांनी मध्येच टिप्पणी केली. या चार स्तंभात अल्पसंख्यांकाचा उल्लेख नाही, असे ते म्हणाले. या टिप्पणीनंतर पंतप्रधान मोदी चांगलेच भडकले. त्यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, तुमच्याकडे मच्छिमार अल्पसंख्यांक समाजाचे नाहीत का? तुमच्याकडे शेतकरी, महिला, युवक अल्पसंख्याक वर्गात नाहीत का? तुम्हाला झालंय काय? असा संतप्त प्रश्न मोदींनी विचारला. जेव्हा शेतकरी, युवक आणि महिलांच्या विकासाचा आम्ही मुद्दा मांडतो, तेव्हा त्यात सर्व धर्मांच्या लोकांचा समावेश असतो. तुम्ही कधीपर्यंत गटा-तटांचा विचार करणार, कधीपर्यंत तुम्ही समाजाची विभागणी करत फिरणार? तुम्ही देशाला आजवर खूपवेळा तोडलं, आता बस करा, असे प्रत्युत्तर मोदींनी दिले.

काँग्रेसचे नेते तर बदलले पण कॅसेट जुनीच सुरू आहे. निवडणुकांचा काळ होता, जरा मेहनत केली असती, काही नवे विषय काढले असते तर जनतेला काही नवा संदेष देता आला असता. पण तेही तुम्हाला जमले नाही, चला आता मी तुम्हाला शिकवतो, हे कसं करतात, असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला.

आज विरोधकांची जी अवस्था आहे, त्याला कारणीभूत काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसला एक मोठा विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली होती. १० वर्ष हा काही कमी कालावधी नाही. पण विरोधी पक्ष होण्यातही ते अपयशी ठरले. ते जेव्हा स्वतः अपयशी झाले, तेव्हा त्यांनी विरोधकांमधील इतर चांगल्या नेत्यांनाही पुढे येऊ दिले नाही. इतर नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. सभागृहात अनेक कुशल, प्रतिभावान खासदार आहेत. मात्र त्यांना बोलू दिले जात नाही. कारण ते बोलायला लागले तर मोठे होतील आणि कोणता तरी नेता छोटाच राहिल. या चिंतेमुळे तरूण खासदारांना बोलू दिले जात नाही. एवढंच नाही तर त्यांना बोलण्याची संधी मिळू नये, म्हणून सभागृहच चालू दिले जात नाही.