संगीत अकादमी की संदेश अकादमी?; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांचा प्रसार करण्याचे आदेश

नामवंत चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अरुण खोपकर यांनी सदानंद मेनन यांच्या मतांशी सहमती दर्शवली.

|| महेश सरलष्कर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांचा प्रसार करण्याचे आदेश; मान्यवरांकडून तीव्र नाराजी

नवी दिल्ली : विविध कला जतन करण्यासाठी वर्षभर नव्या जाणिवांचा शोध घेण्याच्या हेतूने सहा दशकांपूर्वी स्थापन झालेल्या ‘संगीत नाटक अकादमी’ या मातबर सांस्कृतिक संस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या देशभक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रचारक बनविले जात असल्याची टीका सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर करीत आहेत. त्यामुळे ही संगीत अकादमी आहे की संदेश अकादमी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 संगीत नाटक अकादमीला केंद्र सरकारने कुठल्या स्तरावर नेऊन ठेवले आहे, अशा शब्दांत कला संपादक, छायाचित्रकार सदानंद मेनन यांनी खेद व्यक्त केला असून त्यांनी एका ई-मेलद्वारे ही भावना सांस्कृतिक क्षेत्रातील काही ज्येष्ठांकडे व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा देशव्यापी कार्यक्रम राबवला जात आहे. या महोत्सवांतर्गत ‘जन भागीदारी’साठी म्हणजे जास्तीतजास्त लोकांना देशभक्तीचे प्रकटीकरण करता यावे यासाठी तालुका, जिल्हा आणि देश अशा विविध पातळ्यांवर विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने केले आहे.

‘संगीत नाटक अकादमी’च्या संबंधित ई-मेलवर मेनन यांनी मतप्रदर्शन केले आहे. हा ई-मेल वाचल्यानंतर तुम्ही पुढीलपैकी कोणत्या गटात स्वत:ला बसवू शकाल? तुम्हाला हसायला येईल, तुम्हाला रडायला येईल, तुम्ही दातओठ खात संताप व्यक्त कराल की तुम्ही रक्त उसळवणारे राष्ट्रभक्तीपर गीत लिहाल आणि स्पर्धा जिंकाल? तुम्ही कोणत्या गटात मोडता? अशी उपहासात्मक टिप्पणी मेनन यांनी केली आहे.

नामवंत चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक अरुण खोपकर यांनी सदानंद मेनन यांच्या मतांशी सहमती दर्शवली. देशातील अन्य भाषांतील लेखकांचे लिखाण वाचले, देशाचा इतिहास-संस्कृतीचा अभ्यास केला तर देश आतून समजून घेता येतो. हाच नैसर्गिक पद्धतीने देशभक्ती वाढवण्याचा योग्य मार्ग असतो. देशभक्ती कोणावर लादता येत नाही. देशभक्ती कोणत्या प्रकाराने करायची, हे प्रत्येकाने स्वतंत्रपणे ठरवले पाहिजे. एखाद्या शास्त्रज्ञाने त्याच्या क्षेत्रातील सत्य मांडणे ही देशभक्तीच असते. देशभक्ती व्यक्त करण्यासाठी चौकात उभे राहून ओरडण्याची गरज नाही. देशभक्ती ‘आम्हीच’ ठरवणार असे म्हणून कसे चालेल? ही तर ‘देशसक्ती’ झाली. देशभक्ती आणि देशसक्ती यांत फरक आहे. भक्तीमध्ये प्रेम आहे आणि सक्तीत क्रौर्य आहे. त्यामुळे संगीत नाटक अकादमी असो वा अन्य कोणतीही सांस्कृतिक संस्था, तिच्यामार्फत ई-मेल करून, देशभक्तीपर गीते आणि रांगोळ्या काढून देशभक्त होता येत नाही, असे परखड मत अरुण खोपकर यांनी मांडले.

मेनन यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते सतीश आळेकर म्हणाले की, पूर्वी संगीत नाटक अकादमी ही संस्था स्वायत्तपणे काम करत असे. आता तिच्या कामाचे स्वरूप काय हे माहिती नाही. अकादमीने नव्या जाणिवांना खतपाणी घातले पाहिजे. महोत्सव भरवणे, विविध कला जतन करण्यासाठी प्रयत्न करणे हे अकादमीचे काम आहे. बाकी, रांगोळी काढणे वा देशभक्तीपर गीते लिहिणे अशा उपक्रमातून कुणाला देशभक्ती दाखवायची असेल तर हा प्रकार हास्यास्पद आहे.  

संगीत नाटक अकादमीच्या उपसचिव रिटा चौधरी यांनी हा ई-मेल प्रपंच केला आहे. आपल्या या कृतीचे त्यांनी समर्थनही केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित ४०० संस्थांना हा ई-मेल करण्यास सांगितले गेले आहे. ‘जन भागीदारी’ उपक्रमांतर्गत होत असलेल्या स्पर्धांची माहिती देण्यासाठी संगीत नाटक अकादमीने ई-मेल केला तर बिघडले कुठे? ही अकादमी वा अकादमीचे पुरस्कारविजेते देशापेक्षा मोठे आहेत का? राष्ट्रभक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. संगीत नाटक अकादमीने ई-मेल पाठवले म्हणून नाराज झालेले मान्यवर भरल्यापोटी बोलत आहेत. या देशात त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. राष्ट्रभक्ती त्यांना मान्य नसेल, तर त्यांनी देशाबाहेर जावे, तिथे त्यांना कोणते स्वातंत्र्य मिळते बघू या, असा युक्तिवाद चौधरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कारविजेते नामवंत लेखक आणि नाटककार अभिराम भडकमकर यांच्या म्हणण्यानुसार, संगीत नाटक अकादमीने मान्यवरांना पाठवलेल्या ‘ई-मेल’मध्ये अधिकाधिक लोकांनी स्पर्धेत सहभागी होण्याची विनंती केली आहे, सक्ती नव्हे! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र सरकारचा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित संस्थांकडून ई-मेल पाठवण्याची अपेक्षा असू शकते. मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी आणि अशा संलग्न सांस्कृतिक संस्था एकमेकांच्या साह्याने अनेक उपक्रम राबवत असतात. त्यामुळे अकादमीने पाठवलेला ई-मेल वादाचा विषय ठरू नये.

या विषयावर, संवेदनशील चित्रपट दिग्दर्शक-निर्माते आणि लेखक सचिन कुंडलकर म्हणाले की, मी आर्थिक उदारीकरणाच्या पश्चात निर्माण झालेल्या काळात काम करणारा कलाकार आहे. मी आजच्या काळात मोकळेपणाने मला हवे ते काम करू शकलो आहे. संगीत, नाटक, साहित्य, चित्रपट या क्षेत्रांत भरपूर कष्ट करून शिकायला आणि मोकळेपणाने काम करायला कोणत्याही केंद्र सरकारी संस्थेची गरज नाही. गावात पूर्वजांनी बांधलेल्या जुन्या इमारतींविषयी वाटावे तसे मला या जुन्या केंद्रीय संस्थांविषयी कौतुक वाटते. पण त्यांनी कोणते कार्यक्रम राबवावेत, हा त्यांचा प्रश्न आहे. आपण त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे की नाही, हा आपला प्रश्न आहे. आपल्या देशातील अ‍ॅनॉलॉग काळात काम करणाऱ्या आणि सरकारी कौतुकावर अवलंबून असण्याची सवय लागलेल्या अनेक ज्येष्ठ कलाकारांनी ही बाब आत्मसात करावी!

झाले काय

सांस्कृतिक मंत्रालयाने संगीत नाटक अकादमीसह सुमारे ४०० सांस्कृतिक संस्थांना  ‘जन भागीदारी’ स्पर्धांचा देशभर प्रचार करण्याचा ‘आदेश’ दिला आहे. या स्पर्धांत देशभक्तीपर गीते रचणे, अंगाई गीते (लोरी) लिहिणे आणि रांगोळी काढणे यांचा समावेश आहे. त्यानुसार संगीत नाटक अकादमीने पुरस्कारविजेत्या मान्यवरांना १५ नोव्हेंबर रोजी ई-मेल करून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.

टीका काय?  केंद्र सरकारच्या उपक्रमांची माहिती देणारे

ई-मेल पाठवण्यासारखे दुय्यम दर्जाचे काम करून ‘संगीत नाटक अकादमी’ आपल्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाला धक्का लावत असल्याची टीका प्रतिष्ठित कला संपादक, सांस्कृतिक पत्रकारितेचे शिक्षक, छायाचित्रकार सदानंद मेनन यांनी केली आहे. इतर अनेक मान्यवरांनी मेनन यांच्या या मताला पाठिंबा दिला आहे.

अकादमी वा अकादमीचे पुरस्कारविजेते देशापेक्षा मोठे आहेत का? राष्ट्रभक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. ई-मेल पाठवले म्हणून नाराज झालेले मान्यवर भरल्यापोटी बोलत आहेत. या देशात त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. राष्ट्रभक्ती त्यांना मान्य नसेल, तर त्यांनी देशाबाहेर जावे.  – रिटा चौधरी, उपसचिव, संगीत नाटक अकादमी 

एखाद्या शास्त्रज्ञाने त्याच्या क्षेत्रातील सत्य मांडणे ही देशभक्तीच असते. देशभक्ती व्यक्त करण्यासाठी चौकात उभे राहून ओरडण्याची गरज नाही. देशभक्ती ‘आम्हीच’ ठरवणार असे म्हणून कसे चालेल? ही तर ‘देशसक्ती’ झाली. देशभक्ती आणि देशसक्ती यांत फरक आहे. – अरुण खोपकर, चित्रपट दिग्दर्शक, लेखक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Order to propagate the nectar festival programs of independence intense resentment from dignitaries akp

ताज्या बातम्या