Uttar Pradesh : सध्याच्या काळात ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्या रेस्टॉरंट्समधील जेवण आपल्याला पाहिजे, ते जेवण घर बसल्या अनेकजण ऑनलाईन फूड डिलीव्हरी अ‍ॅप्सवरुन मागवतात. मग त्याममध्ये व्हेज असेल किंवा नॉनव्हेज. मात्र, आता उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने ऑनलाईन फूड डिलीव्हरी अ‍ॅप्सवरुन शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यानंतर काही वेळाने जेवण मिळालं. मात्र, ते जेवणाचं पॅकेट उघडलं आणि त्या व्यक्तीला धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने आरोप केला आहे की, त्यांचे काही नातेवाईक रक्षाबंधनासाठी घरी आले होते. तेव्हा त्यांच्यासाठी ऑनलाईन शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र, त्यात शाकाहारी जेवणाऐवजी त्यांना मांसाहारी पदार्थ मिळाले, असा आरोप केला आहे. उन्नाव येथील रहिवासी धीरज सिंग यांनी म्हटलं की, “शनिवारी रात्री एका रेस्टॉरंट्समधून त्यांच्या कुटुंबासाठी पनीरची भाजी आणि रोट्या मागवल्या होत्या. जेवण मिळाल्यानंतर पनीरच्या थाळीत काहीतरी वेगळं दिसलं आणि त्यानंतर व्यवस्थित पाहिलं असता त्यामध्ये चिकन लेग पीस असल्याचं आढळून आलं”, असा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, त्यानंतर सिंग यांनी ताबडतोब ऑनलाईन डिलिव्हरी अॅपद्वारे संबंधित रेस्टॉरंट्शी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित रेस्टॉरंट्सकडून दिलेल्या उत्तरावर त्यांचं समाधान झालं नाही. त्यानंतर त्यांनी संबंधित घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला आणि जिल्हा प्रशासनाला अशा प्रकारच्या रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्याची मागणी केली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सदर घटनेची पोलिसांनी पुष्टी केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटची पाहणी केली आणि ते तात्पुरते बंद केलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

रेस्टॉरंट मालकाने कबूल केलं की शाकाहारी ऑर्डर चुकून मांसाहारी ऑर्डरमध्ये आली होती. दरम्यान, अधिकाऱ्यांना तपासणीवेळी असंही आढळून आलं की एकाच स्वयंपाकघरात शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तयार केलं जात होतं. त्यानंतर चाचणीसाठी पीठ आणि रस्सा याचे नमुने अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था होईपर्यंत रेस्टॉरंट बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.